Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी रात्री (१६ जानेवारी) चाकूने प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. सैफच्या पाठीतून डॉक्टरांनी सुमारे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. यामुळे त्याला पॅरालिसिस मारण्याचा धोका असल्याचा खुलासाही डॉक्टरांनी केला होता. आता सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिले असून अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले डॉक्टर डांगे?
सैफ अली खना यांना सर्जरीनंतर ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. आज त्यांनी चालायचादेखील प्रयत्न केला. आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. बाकीची कोणती लक्षणंही दिसत नाही आहेत. त्यांच्या जखमा आता बऱ्या होत आहेत. हे सगळं लक्षात घेता आता त्यांना ICU मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. पण, त्यांना सक्त विश्रांतीची गरज असल्याने तसा सल्ला दिला गेला आहे. त्यांच्या पाठीवरच्या जखमेमुळे त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. पाठीतून जे पाणी येत होतं तेदेखील आता बंद झालं आहे. पण, लवकर बरं होण्यासाठी त्यांना जास्त हालचाली न करण्याचा सल्ला दिला आहे. देवाच्या कृपेने त्यांना पॅरालिसिस मारायचा धोकाही टळला आहे.
नेमकं काय घडलं?
हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिलं आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.