Join us  

मी काही संत नाही, मलाही राग येतो...! नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर

By रूपाली मुधोळकर | Published: September 30, 2020 5:53 PM

पहिल्याच बॉलिवूड सिनेमातून श्रियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण अनेक स्टारकिड्सप्रमाणे श्रियाचे नावही बॉलिवूडमधील नेपोटिजमच्या वादात ओढले गेले. 

ठळक मुद्देश्रियाने सचिन पिळगावकर यांचीच निर्मित असलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही मराठी सिनेसृष्टीतील सिनेसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्यांची एकुलती एक मुलगी श्रिया पिळगावकर ही सुद्धा आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीत आली. शाहरूख खानसोबत ‘फॅन’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकली. पहिल्याच बॉलिवूड सिनेमातून श्रियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण अनेक स्टारकिड्सप्रमाणे श्रियाचे नावही बॉलिवूडमधील नेपोटिजमच्या वादात ओढले गेले. लेकीचे नाव नेपोटिजमच्या वादात आल्यावर काय वाटते, यावर सचिन पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले. लेकीचे नाव बॉलिवूडमधील नेपोटिजमच्या वादात ओढले जाते, तेव्हा संताप येतो का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला, यावर सचिन यांनी मी सुद्धा माणूस आहे. मलाही हृदय आहे, मलाही त्रास होतो, अशी प्रामाणिक कबुली दिली.

या सर्व गोष्टी, चर्चा, वाद सामान्य आहेत. इकडच्या तिकडच्या काही गोष्टी निश्चितपणे त्रासदायक ठरतात. मात्र सुदैवाने आम्ही सगळे एकत्र आहोत. एखादा चिडला, संतापला किंवा वैतागला तर दुसरा त्याला शांत करतो. पण मला अशा गोष्टी ऐकून राग येत नाही, असे खोटे मी सांगणार नाही. मी मनुष्य आहे. मी काही संत नाही. मला सुद्धा हृदय आहे, असे सचिन म्हणाले.

आई-वडिल या नात्याने श्रियाला सल्ला देता का? यावर बोलताना आमच्याबद्दल जरा उलट आहे. कारण श्रियाला मी नाही तर तिच अनेकदा मला सल्ले देते, असे सचिन म्हणाले. आज काल मुलांना हे कर, हे करू नकोस, असे काहीही सांगण्याची गरज नाही. मुलांना त्यांचे स्वत:चे आयुष्य आहे. ती जगण्याची त्यांची स्वत:ची पद्धत आहे. मला तरी त्यात ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही. ती आमची मुलगी आहे. ती अभिनयक्षेत्रात कमी पडतेय, असे वाटले तर आम्ही फक्त तिला सांगू शकतो.  केवळ ती आमची मुलगी आहे म्हणून आम्ही शांत राहिलो किंवा उगाच तिची स्तुती केली, असे आमच्याकडून कधी घडले नाही. सुदैवाने आज ती जे काही करतेय, त्याचे आम्हाला कौतुक आहे. त्यामुळे तिला सल्ले वगैरे देण्याची गरजच भासली नाही, असेही सचिन म्हणाले.

श्रियाने सचिन पिळगावकर यांचीच निर्मित असलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. हा सिनेमा सचिन यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमातील श्रियाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात  पेटेंड सिग्नल  (2012) आणि  ड्रेसवाला (2013) या शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून केली होती. 2016 मध्ये तिने ‘फॅन’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले़ यानंतर मिर्झापूर सीरिजमध्येही ती झळकली.

टॅग्स :सचिन पिळगांवकरश्रिया पिळगावकर