Join us  

फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचच्यावेळी रोहित शेट्टीने सांगितला त्याच्या बालपणीचा हा मजेदार किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 4:56 PM

व्हीसीआरचा काळ कसा होता हा फालतुगिरी पुस्तकातील एक भाग वाचताना रोहितने त्याच्या आयुष्यातील व्हीसीआरच्या किस्स्यांविषयी सांगितले.

ठळक मुद्देशाळेत असताना रोहितने एक नाटक दिग्दर्शित केले होते. त्या नाटकात शोलेमधील गब्बर सिंगचे पात्र देखील होते. पण त्यावेळी कॅसेट सतत अडकत असल्याने त्यांचे हे नाटक चांगलेच फ्लॉप झाले होते असे रोहितने सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार जान्हवी सामंत यांनी लिहिलेल्या फालतुगिरी या पुस्तकाचे अनावरण नुकतेच प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या हस्ते करण्यात आले. ऐंशीच्या दशकातील बालपण कसे होते यावर आधारित असलेले हे हलके फुलके पुस्तक असून या पुस्तकाच्या लाँचच्या दिवशी या पुस्तकातील काही मजेशीर किस्से ऐकवण्यात आले. हे ऐकून उपस्थित असलेले सगळे त्यांच्या भूतकाळात रमले. व्हीसीआरचा काळ कसा होता हा पुस्तकातील एक भाग वाचताना रोहितने त्याच्या आयुष्यातील व्हीसीआरच्या किस्स्यांविषयी सांगितले. तो शाळेत असताना त्याने एक नाटक दिग्दर्शित केले होते. त्या नाटकात शोलेमधील गब्बर सिंगचे पात्र देखील होते. पण त्यावेळी कॅसेट सतत अडकत असल्याने त्यांचे हे नाटक चांगलेच फ्लॉप झाले होते असे रोहितने सांगितले. तसेच ऐंशीच्या दशकात चित्रपटाचे पोस्टर कसे असायचे. तसेच त्या काळातील अनेक चित्रपटात प्राणी कशाप्रकारे मुख्य भूमिकेत असायचे या ऐंशीच्या दशकातील चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या गोष्टींवर त्याने प्रकाशझोत टाकला.

रोहित प्रमाणेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉक्युमेंट्री फिल्ममेकर परोमिता वोहरा आणि संगीतकार अनू मलिक यांनी देखील आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सोनालीने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांच्या कॉलनीत आयोजित केलेल्या एका नाटकाविषयी सांगितले. या नाटकात अभिनय करणारी सगळीच लहान मुले नाटक सुरू असतानाच रंगमंचावर खाण्यात इतकी व्यग्र होती की, काहीही करून पुढचे दृश्य सुरू होत नव्हते किंवा हातातील पदार्थ सोडून जाण्यासही ते तयार नव्हते. सोनालीचा हा किस्सा ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

अनू मलिकने रोहित शेट्टीच्या वडिलांनी त्याला कारकिर्दीच्या सुरुवातीला कशाप्रकारे मदत केली होती याविषयी या कार्यक्रमात सांगितले. अनू स्ट्रगल करत असताना रोहित शेट्टीच्या वडिलांनी काम कशाप्रकारे मिळवायचे याविषयी टिप्स दिल्या होत्या असे अनूने आवर्जून यावेळी सांगितले. तसेच जुली जुली हे ऐंशीतील प्रसिद्ध गाणे गात अनूने या कार्यक्रमाची सांगता केली. 

जान्हवी सामंत यांचे फालतुगिरी हे इंटरेस्टिंग पुस्तक विकत घेण्यासाठी http://bit.ly/faaltugiri_amazon या लिंकवर क्लिक करा.

टॅग्स :रोहित शेट्टी