Ritesh Deshmukh: मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. हिंदी चित्रपटातदेखील त्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. कधी गंभीर, विनोदी, तर कधी रोमँटिक अशी पात्र साकारली आहेत. अखंड महाराष्ट्राचा दादा असणारा रितेश मराठी प्रेक्षकांसाठी 'वेड' चित्रपट घेऊन आला होता. त्याचा या चित्रपटाला प्रेक्षकाचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. आता 'वेड' च्या प्रचंड यशानंतर त्यानं 'रेड २'मधील त्याच्या दादाभाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पुन्हा आपलंस केलं. 'रेड २'नंतर आता रितेश हा 'हाऊसफुल ५'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रितेश लवकरच 'हाऊसफुल ५' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि इतर १८ दमदार कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ कॉमेडीच नाहीतर एका खुनाचा गूढ थरार पाहायला मिळणार आहे. जो प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. येत्या ६ जूनला हा बहुचर्चित चित्रपट सर्वत्र रिलीज करण्यात येणार आहे.
'हाऊसफुल ५'नंतर रितेशचा ऐतिहासिक 'राजा शिवाजी' हा चित्रपट येणार आहे. रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. 'वेड'नंतर 'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने रितेशच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा दुसरा सिनेमा असणार आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या 'वेड' चित्रपटाने तब्बल ७५ कोटींचा गल्ला जमवून मराठी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. ओटीटीवरही 'वेड' सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये सामील झाला.
रितेश फक्त चित्रपटांपुरताच नाही, तर 'बिग बॉस मराठी सीझन ५' मध्ये होस्ट म्हणूनही त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचा 'भाऊचा धक्का' वीकेंड एपिसोड्स टीआरपीमध्ये झपाट्याने वर गेला होता. रितेशच्या अभिनयातून प्रेक्षकांना भावनिक ओलावा, स्टाईल आणि कनेक्ट जाणवतो. आता रितेशला नव्या रुपात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.