बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पती-पत्नी झाले. सुरुवातीला दोघांनीही त्यांचं हे रिलेशनशिप सीक्रेट ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पण कधी कुणाचं प्रेम लपलंय का? जे यांचही लपेल. जे दिसायचं ते लोकांना दिसलंच. मग रणवीरने पुढाकार घेऊन याबाबत अनेकदा खुलासेही केले. अशात आता दीपिकाने रणवीरसोबत तिला कसं रिलेशनशिप हवं होतं याचा खुलासा केलाय.
फिल्मफेअर मॅगझीनला दीपिकाने नुकतीच मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तिने तिच्या आधीच्या रिलेशनशिपबाबतही अनेक नवीन खुलासे केले आहेत. यात तिने रणवीरसोबतच्या रिलेशनशिपबाबत खुलेपणाने गप्पा केल्या. ती म्हणाली की, रणवीरसोबत तिला आधी केवळ ओपन रिलेशनशिपमध्ये रहायचं होतं.
ती म्हणाली की, 'मी आधीही काही रिलेशनशिपमध्ये होते आणि माझा विश्वास पूर्णपणे तुटला होता. मी जेव्हा रणवीरला भेटले तेव्हा मी फार थकले होते. मी कधीही कुणाला कॅज्युअल डेट केलं नाही. मी १३ वर्षांची असतानापासून रिलेशनशिपमध्ये होते. मग ते रिलेशनशिप एक वर्षासाठी असो वा दोन वर्षांसाठी असो किंवा ३ वर्षांसाठी, या सर्व प्रॉपर रिलेशनशिप होत्या. हे असं होतं की, जर तुम्ही कुणावर प्रेम करता तर त्याला आपलं १०० टक्के द्यायचं. त्यामुळे २०१२ मध्ये रिलेशनशिप संपल्यावर मी निर्णय घेतला होता की, आता बस्स! आता मला कॅज्युअल डेटींग ट्राय करायचं होतं. मला कुणालाही स्पष्टीकरण देत बसायचं नव्हतं'.
ती पुढे सांगते की, 'जेव्हा मी २०१२ मध्ये रणवीरला भेटले तेव्हा मी त्याला म्हणाले की, मला वाटतं आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे. मला तू खरंच आवडतो. पण मला या रिलेशनशिपला ओपन ठेवायचं आहे. मला कमिटमेंट करायची नाहीये. जर मी यादरम्यान वेगवेगळ्या लोकांकडे आकर्षित झाली, तर मी माझ्या मनाने निर्णय घेणार. पण असं काही झालं नाही आणि मी असं काही केलं नाही'.