या कारणामुळे हर्षवर्धन राणे वळला तेलगु इंडस्ट्रीकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 18:13 IST
सनम तेरी कसम या चित्रपटात झळकलेला हर्षवर्धन राणे लवकरच अभिनेता धनुषसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटाचे चित्रीकरण ...
या कारणामुळे हर्षवर्धन राणे वळला तेलगु इंडस्ट्रीकडे
सनम तेरी कसम या चित्रपटात झळकलेला हर्षवर्धन राणे लवकरच अभिनेता धनुषसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. हर्षवर्धनने आतापर्यंत अनेक तेलगु चित्रपटात काम केले आहे. त्याच्या अभिनय प्रवासाविषयी त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा...हर्षवर्धन तुझा अभिनयप्रवास कसा सुरू झाला?मी लहान असल्यापासूनच मला अभिनयाची आवड होती. टिव्ही पाहाताना टिव्हीतील हे लोक जे करतात, ते मला करायचे आहे असे मी खूप कमी वयातच ठरवले होते. पण माझे वडील डॉक्टर असल्याने त्यांनी माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला नाही. मी शिकून डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे मी घरातून पळालो आणि दिल्लीत एका मेसमध्ये जेवण करणाऱ्या मुलांसोबत राहू लागलो. छोटे-मोठे जॉब करून मी अभिनयाचे क्लासेस लावले. माझ्या एका मित्राच्या मदतीने मी लेफ्ट राईट लेफ्ट या मालिकेचे ऑडिशन दिले. मी पहिल्याच ऑडिशनमध्ये पास झालो आणि छोट्या पडद्यावरील माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.मालिका करत असताना तू तेलगू चित्रपटाकडे कसा वळला?माझी मालिका संपल्यानंतर मी दुसऱ्या भूमिकांच्या शोधात होतो. मी एका ऑडिशनला गेलो असता चुकून दुसऱ्याच रूमचा दरवाजा ठोठावला. पण मी त्यांना सॉरी बोलून बाहेर निघत होतो. पण तिथे सुरू असलेल्या तेलगू चित्रपटासाठी मी ऑडिशन द्यावे असे तेथील मंडळींनी मला सुचवले आणि मला माझा पहिला तेलगू चित्रपट मिळाला. माझ्या पहिल्या चित्रपटात एकूण चार हिरो होते. पण तरीही माझी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. माझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. पण त्यानंतर मला तीन वर्षं चित्रपटाच्या चांगल्या ऑफर आल्या नाहीत. मला सगळ्या खलनायकाच्या भूमिकेच्याच ऑफर येत होत्या. काही केल्या मला पडद्यावर खलनायक साकारायचा नाही असे मी ठरवले होते. त्यामुळे मी तीन वर्षं हैदराबादमध्येच राहून चांगल्या भूमिकेची प्रतीक्षा केली आणि अचानक मला एकत्र पाच चित्रपट मिळाले आणि तेलगू इंडस्ट्रीत माझे चांगलेच बस्तान बसले.तुला तेलगू ही भाषा येत होती का? पहिला चित्रपट करताना काही भाषेची अडसर जाणवली का?माझे वडील मराठी आहेत तर माझी आई तेलगू. पण मी घरात कधीच या दोन्ही भाषा बोललेलो नाही. माझे बालपण मध्यप्रदेश येथे गेल्याने मला केवळ हिंदी येते. त्यामुळे पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना भाषेमुळे मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पहिल्या चित्रपटाच्यावेळी मला चित्रपटाच्या टीमकडून प्रत्येक शब्दांचे अर्थ समजवून घ्यावे लागले. शब्द कळल्याशिवाय अभिनय करणे हे कठीण होते. पण माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीमने त्यावेळी मला खूप मदत केली. तेलगू चित्रपटात काम करायचे तर भाषा शिकणे सगळ्यात महत्त्वाचे आहे याची मला त्यावेळी चांगलीच जाणीव झाली. त्यामुळे मी चित्रपट करत नसलेल्या काळात म्हणजेच तीन वर्षांच्या ब्रेकमध्ये तेलगू शिकलो आणि आता तर मला ही भाषा खूपच चांगली येते. तू धनुषसोबत एक चित्रपट करत आहेस, त्यात तुझी भूमिका काय असणार आहे?मणिरत्नम यांच्या अग्नि नतचथिराम या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून यात माझी आणि धनुषची प्रमुख भूमिका असणार आहे. या चित्रपटात आम्ही दोघे खूप सारे अॅक्शन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या धनुष त्याच्या इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने आमच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली नाहीये. पण आम्ही लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत.