Join us  

'क्या काम किया आपने...' रवी किशनही झाले प्रभावित, छाया कदम यांचं भरभरुन केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 2:31 PM

अभिनेते शशांक शेंडेंनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, 'मराठीत दखल घेतील/नाही घेतील...'

मराठीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची दखल अतर भाषांतील कलाकारांनीही घेतली आहे. त्यापैकीच एक अभिनेत्री छाया कदम. 'सैराट', 'न्यूड' सारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारणाऱ्या छाया कदम हिंदीतही सक्रीय आहेत. नुकतंच त्यांनी आमिर खानच्या प्रोडक्शन अंतर्गत किरण राव दिग्दर्शित सध्या चर्चेत असलेल्या 'लापता लेडीज' मध्ये काम केलं. त्यांचं काम पाहून अभिनेते रवी किशनही (Ravi Kishan) प्रभावित झाले. त्यांनी छाया कदम (Chhaya Kadam) यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

अभिनेते शशांक शेंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  यामध्ये रवी किशन हे छाया कदम यांच्या कामाची स्तुती करताना दिसत आहेत. 'लापता लेडीज' मध्ये रवी किशन यांचीही मुख्य भूमिका आहे. 'क्या काम किया आपने...कितना अच्छा काम किया...' अशा शब्दात ते छाया कदम यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत शशांक शेंडे लिहितात, 'छाया कदम...सगळीकडून कौतुकाचा वर्षाव चालू आहे ...कमाल ...आपल्याला व्यक्तिगत माहीत नसलेल्या लोकांनी कामाची दखल घेवून ते बोलून दाखवलं ...आपल्याकडे ( मराठी मध्ये)कामाची दखल घेतील / घेणार नाहीत .....पण योग्य ठिकाणी काम पोचते आहे ....अभिमानास्पद आहेकमाल ...बेस्ट ....keep it up....अभिनंदन!'

शशांक शेंडे यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीविषयी मनातील खदखद बोलून दाखवली. तसंच छाया कदम यांच्या कामाची दखल बाहेरच्या इंडस्ट्रीतील लोक घेत आहेत हेही सांगितलं. काही दिवसांपूर्वीच छाया कदम यांनी आमिर खान आणि किरण राव सोबत फोटो शेअर करत 'लापता लेडीज' सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. 

छाया कदम यांनी सैराटमध्ये छोटी भूमिका साकारली होती. शिवाय रवी जाधवच्या 'न्यूड' या सिनेमात त्या मुख्य भूमिकेत होत्या. संजय लीला भन्साळींच्या 'गंगूबाई काठियावाडी' मध्येही त्यांनी काम केलं. 

टॅग्स :रवी किशनमराठी अभिनेताबॉलिवूडसिनेमा