Join us  

'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 4:13 PM

रणवीर सिंग 'डॉन' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे.

रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. रणवीर त्याच्या अभिनयाबरोबरच फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. हटके फॅशनने तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. 'पद्मावत', 'सिम्बा', 'बाजीराव मस्तानी', 'गली बॉय', '८३', 'गुंडे', 'सुर्यवंशी' अशा सिनेमांमध्ये रणवीर विविधांगी भूमिका साकारताना दिसला. 

आता रणवीर सिंग 'डॉन' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'डॉन ३' या सिनेमात रणवीर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. भारताबरोबरच परदेशातही 'डॉन ३'चं शूटिंग होणार असून २०२५मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माहिती निर्माते साजिद नाडियावाला यांनी दिली आहे. पण, डॉननंतर रणवीर शक्तिमानच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. "डॉन ३ नंतर रणवीर शक्तिमानसाठी शूट करणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून या सिनेमाचं स्क्रिप्टिंग सुरू आहे. आता शक्तिमान या भूमिकेला न्याय देऊ शकेल, अशी स्क्रिप्ट तयार झाली आहे," असं ते पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

रणवीर सिंग आगामी 'सिंगम अगेन', 'डॉन ३' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'डॉन ३' सिनेमा २०२५मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शक्तिमान सिनेमा २०२६मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. पण, याबाबत अद्याप अभिनेत्याने भाष्य केलेलं नाही. दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' सिनेमात रणवीर दिसला होता. या सिनेमात त्याने आलिया भटसोबत स्क्रीन शेअर केली होती. करण जोहरच्या या सिनेमात रणवीर-आलियाबरोबर धर्मेंद्र, जया बच्चन, क्षिती जोग हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 

टॅग्स :रणवीर सिंगसिनेमासेलिब्रिटी