Join us

राखी सावंतला वादग्रस्त वक्तव्य भोवले; सर्वांसमोर मागावी लागली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 15:15 IST

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिला तिच्या फटकळ बोलण्यासाठी ओळखले जाते. तिला स्वत:च्या वाणीवर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य असल्याने ...

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिला तिच्या फटकळ बोलण्यासाठी ओळखले जाते. तिला स्वत:च्या वाणीवर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य असल्याने बºयाचदा ती यामुळे अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा ती अशाच प्रकारे अडचणीत सापडताना दिसली. प्रकरण एवढे वाढले की, तिला अखेर माफी मागावी लागली. भगवान वाल्मीकीजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून राखीला शुक्रवारी माफी मागावी लागली. चंदीगड येथील शासकीय विश्रामगृहात एका बैठकीप्रसंगी राखीवर गुन्हा दाखल करणारे अ‍ॅड. नरिंदर आदिया आणि अन्य लोकांसमोर राखीने भगवान वाल्मीकी यांच्या फोटोसमोर हात जोडून सर्वांची माफी मागितली. त्याचबरोबर आपण केलेल्या वक्तव्यावर दु:खही व्यक्त केले. राखीच्या या माफीनाम्यानंतर सर्वांनी तिला माफ केले. तसेच दोन्ही पक्षांकडून एका समजूतदार करारावर सह्या केल्या. काही वर्षांपूर्वी राखीने भगवान वाल्मीकी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर अ‍ॅड. नरिंदर आदिया यांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. यासाठी राखीला न्यायालयातही हजर राहावे लागले होते. जेव्हा प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आले तेव्हा राखीने माफी मागणे अधिक संयुक्तिक समजले. शुक्रवारी शासकीय विश्रामगृह याठिकाणी अ‍ॅड. नरिंदर आदिया यांच्यासह एका बैठकीचे आयोजन केले होते. जेव्हा ही बाब मीडियाला समजली तेव्हा त्यांनीही बैठकीचे ठिकाण गाठले. मात्र सुरुवातीला त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. त्यानंतर स्वत: राखीने मीडियाच्या समोरच भगवान वाल्मीकी यांच्या फोटोला हात जोडले. तसेच आपण केलेल्या वक्तव्याची जाहीरपणे माफीही मागितली. राखीवर गुन्हा दाखल करणारे अ‍ॅड. नरिंदर आदिया यांनी म्हटले की, राखी सावंतला तिने केलेल्या चुकीची जाणीव झाली. त्यामुळे तिने सादर केलेल्या माफीनाम्यामुळे आम्ही पूर्णत: संतुष्ट आणि समाधानी आहोत. नरिंदर आदिया यांनी राखीवर भगवान वाल्मीकी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. पुढे राखी विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले.