Join us

कृपा करून मला वेदना देऊ नका...! चाहत्यांच्या दबावामुळे रजनीकांत व्यथित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 15:08 IST

कृपया माझ्यावर दबाव टाकू नका...

ठळक मुद्देरजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे याआधी जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती.

काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते  रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी  प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात  उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहिर केले. रजनीकांत आपल्या या निर्णयावर ठाम आहेत. मात्र तरीही, त्यांनी राजकारणात यावे, असा चाहत्यांचा आग्रह आहे. केवळ आग्रह नाही तर  चाहत्यांनी यासाठी निदर्शने, आंदोलन सुरु केले आहे.

रजनीकांत राजकारणात येणार नसतील तर आम्ही येणा-या निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही, अशी ताठर भूमिका चाहत्यांनी घेतली आहे. रजनीकांत यामुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थेतून त्यांनी कृपा करून मला वेदना देऊ नका, असे आवाहन चाहत्यांना केले आहे.ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हे आवाहन केले.  राजकारणात येण्याचा निर्णय मी का रद्द केला, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. कृपा करून माझ्यावर राजकारणात येण्यासाठी दबाव टाकू नका. मला वेदना देऊ नका, असे त्यांनी लिहिले आहे.

रजनीकांत म्हणाले...मी सक्रीय राजकारणात यावे यासाठीच्या आंदोलनात सहभागी न झालेल्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी यापूर्वीच माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मी राजकारणात येण्याचा निर्णय का रद्द केला, हे मी सांगितले आहे. मी विनंती  करतो की, माझ्या राजकीय प्रवेशाचीच मागणी करत अशाप्रकारची आंदोलने करु नका. राजकारणात येण्यासाठी माझ्यावर दबाव टाकून नका. यामुळे मला  वेदना होतात, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

रजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे याआधी जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. नव्या वर्षात होणा-या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा रजनीकांत यांचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. रजनीकांत यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही पाहिले जाऊ लागले होते. पण ऐनवेळी रजनीकांत   यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

 

 

 

टॅग्स :रजनीकांत