राजकुमार यांनी दिग्दर्शकासमोर कुत्र्याला विचारून चित्रपटाला दिला होता नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 17:38 IST
‘जानी’ या डायलॉगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजकुमार यांचा इंडस्ट्रीमधील रुबाब अखेरपर्यंत कायम होता, वास्तविक जीवनातही ते स्टाइलने जगत होते. वाचा त्यांच्या आयुष्याशी निगडित एक किस्सा!
राजकुमार यांनी दिग्दर्शकासमोर कुत्र्याला विचारून चित्रपटाला दिला होता नकार!
बॉलिवूडमध्ये ‘जानी’ हा शब्द कानावर पडताच अशा अभिनेत्याची छबी समोर येते ज्याचा आवाज आणि अभिनयाने सर्वच घायाळ होत असे. होय, हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून राजकुमार आहे. राजकुमार यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास ६० चित्रपटांमध्ये काम केले. या प्रत्येक चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ६० ते ८० चे दशक राजकुमार यांच्यासाठी सुवर्ण ठरले. १९५२ मध्ये आलेल्या ‘रंगिली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया राजकुमार यांनी ‘आबशार’, ‘घमंड’ आणि ‘लाखों में एक’ यांसारख्या चित्रपटांत दमदार अभिनय करून आपली छाप सोडली. या अभिनेत्याच्या नावात जेवढा दम होता, तेवढाच अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरीमध्ये होता. कारण राजकुमार यांचा प्रत्येक डायलॉग चर्चिला जात असे. विशेष म्हणजे आजही त्यांचे डायलॉग प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. राजकुमार यांचा रुबाब जेवढा चित्रपटांमध्ये होता तेवढाच वास्तविक जीवनातही होता. याचा प्रत्यय एका किश्श्यावरून येतो, जेव्हा दिग्दर्शकाच्या समोर कुत्र्याला विचारून त्यांनी चित्रपटाला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. हा किस्सा ९० च्या दशकातील आहे. त्याकाळी राजकुमार यांच्याकडे मोजक्याच चित्रपटांच्या आॅफर होत्या. मात्र अशातही त्यांच्या रुबाबात अन् स्टाइलमध्ये कमतरता नव्हती. ‘इन्सानियत का देवता’, ‘पुलिस और मुजरिम’ हे राजकुमारचे चित्रपट त्याकाळी बॉक्स आॅफिसवर फारसे यशस्वी ठरले नव्हते. त्याचदरम्यान दिग्दर्शक रामानंद सागर राजकुमार यांच्याकडे एका चित्रपटाची आॅफर घेऊन आले. त्यावेळी रामानंद सागर राजकुमारचे चांगले मित्र होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार रामानंद सागर यांनी राजकुमार यांना चित्रपटाची कथा सांगताना लीड रोल आॅफर केला होता. त्याचबरोबर दहा लाख रुपये देण्यासही समर्थता दर्शविली. मात्र त्याचदरम्यान राजकुमारचा एक कुत्रा रूममध्ये आला, त्यानंतर जे घडले त्याची रामानंद सागर यांनी अपेक्षाही केली नव्हती. राजकुमार यांनी दिग्दर्शक रामानंद सागर यांच्यासमोर त्यांच्या कुत्र्याला विचारले की, ‘मी हा चित्रपट करायला हवा काय?’ त्यावेळी कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. मग जे घडले ते रामानंद सागर यांना धक्का देणारे होते. कारण राजकुमार यांनी त्यांना सांगितले की, माझ्या कुत्र्यालाही तुझ्या या चित्रपटाची आॅफर मान्य नाही. मग मी हा चित्रपट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.