बॉलिवूडमधील कपूर खानदानाविषयी आज साऱ्यांनाच ठावूक आहे. या कुटुंबातील राज कपूरपासून ते करीना कपूर खानपर्यंत प्रत्येक पिढीतील एक तरी व्यक्ती कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात सध्याच्या घडीला करीना कपूर-खान (kareena kapoor-khan) आणि करिश्मा कपूर (karisma kapoor) या दोघी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. यात करिश्मा ९० च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विशेष म्हणजे करिश्माचा कलाविश्वातील हा प्रवास सोपा नव्हता. काहींच्या मते, आपल्या नातीने म्हणजेच करिश्माने बॉलिवूडमध्ये येऊ नये अशी राज कपूर यांची इच्छा होती. परंतु, याविषयी करिश्मा व्यक्त झाली असून राज कपूर यांनी तिच्या पुढे एक अट ठेवली होती असं तिने सांगितलं.
करिश्माने वयाच्या १७ व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९९१ मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. त्यानंतर एकावर एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. परंतु, करिश्माला अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी राज कपूर यांनी तिच्यापुढे एक अट ठेवली होती. ही अट करिश्माने मान्य केल्यामुळे तिचा बॉलिवूड पदार्पणाचा मार्ग सुकर झाला. अलिकडेच एका मुलाखतीत करिश्माने या अटीविषयी सांगितलं आहे.
काय होती राज कपूर यांची अट?
"माझं संपूर्ण कुटुंबच कलाकारांनी भरलेलं आहे. माझे वडील आणि त्यांच्या भावंडांनीदेखील अभिनेत्रींसोबतच लग्न केलं. जर ते अभिनेत्रींसोबत लग्न करु शकतात. तर, मग त्या कलाविश्वात काम का करु शकत नाहीत? हाच लोकांचा गैरसमज होता. लोकांना वाटायचं की, कपूर खानदानातील सूना चित्रपटांमध्ये काम करत नाहीत. पण तसं नाहीये", असं करिश्मा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी अभिनेत्री होणार हे त्यांना ( राज कपूर) माहित होतं. ते कायम म्हणायचे, लोलो बेबी, मला माहितीये तू अभिनेत्रीच होणार. पण, फक्त अभिनेत्री होऊ नकोस. व्हायचं असेल तर बेस्ट अभिनेत्री हो आणि तरच कलाविश्वात पदार्पण कर".
दरम्यान, राज कपूर यांनी करिश्माला बेस्ट अभिनेत्री होणार असशील तरच बॉलिवूडमध्ये पदार्पण कर अशी अट ठेवली होती. विशेष म्हणजे करिश्माने केवळ ही अटच पूर्ण केली नाही तर आजही आजोबांना दिलेला शब्द पाळत आहे. या मुलाखतीत तिने तिच्या वडिलांविषयीदेखील भाष्य केलं. करिअरमध्ये माझ्या वडिलांनीही खूप मदत केली. ते सतत प्रोत्साहन देत गेले असं ती म्हणाली.