Join us  

​स्मिता पाटीलच्या अंत्यदर्शनला राज बब्बर यांची पहिली पत्नी देखील होती हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 9:27 AM

श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५ मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. या पहिल्याच ...

श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५ मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. या पहिल्याच चित्रपटाने स्मिता पाटील यांना स्टार बनवले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या स्मिता यांनी ७५ चित्रपट केलेत. निधनानंतर त्यांचे १४ चित्रपट रिलीज झालेत. स्मिता पाटील यांचे खाजगी आयुष्य बरेच वादळी राहिले. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना स्मिता यांना अनेकांचा रोष सहन करावा लागला. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. त्यांना दोन मुले होती. विवाहित राज बब्बर स्मिताच्या प्रेमात आकंठ बुडाले. स्मिताही त्यांच्यासोबत राहू लागल्या. पण खुद्द स्मिताच्या आईला तिचे हे रिलेशन मान्य नव्हते. पण आईचे काहीही न ऐकता स्मिता यांनी राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘स्त्रीवादी’ स्मिता पाटील यांना घर फोडणारी महिला ठरवण्यात आले.  सर्व विघ्न पार करून दोघांनी विवाह केला; पण मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता आता शांत आणि उदास झाली होती. राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचाही त्यांचा विचार होता. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. १३ डिसेंबर १९८६ रोजी राज आणि स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर माझा मृतदेह एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे सजवला जावा, अशी स्मिता यांची इच्छा होती. त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस बर्फात ठेवण्यात आला होता. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेमध्ये राहत होती.  स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली आणि त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली. त्यांचे व्यावसायिक मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा विवाहित महिलेप्रमाणे मेकअप केला.  स्मिता पाटील यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यांची स्मिता आज त्यांच्यात नाहीये या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण स्मिता पाटील यांच्या अंत्यदर्शनाला राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नी नादिरा बब्बर त्यांची मुले जुही आणि आर्य यांच्यासोबत उपस्थित होत्या. Also Read : ​स्मिता पाटीलविषयी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाने केले मोठे वक्तव्य, वाचा काय म्हटले?