Join us  

Raaj Kumar : क्या राय है फिल्म करे...? राज कुमार यांनी चक्क आपल्या कुत्र्याला विचारलं आणि मग....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 8:00 AM

Raaj Kumar Birth Anniversary : बरखुरदार, अपने बाप से पूछना कौन हूं मैं..., असं सलमानला सुनावणारे, नाना पाटेकरांना ‘जाहिल’ म्हणणारे आणि मेरे लिए जीतेंद्र हो धर्मेन्द्र हो या फिर कोई बंदर हो, क्या फर्क पडता है... म्हणत धर्मेन्द्र यांना डिवचणारे राज कुमार एक वेगळंच रसायन होतं...

Raaj Kumar Birth Anniversary : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या नावांची यादी करायची झालीच तर या यादीत एक नावं हमखास अव्वल स्थानी असेल. हे नाव कुणाचं तर राज कुमार (Raaj Kumar ) यांचं.  सुटाबुटात आणि मोठ्या रुबाबात हातातला पाईप सावरत पडद्यावर राज कुमार यांची एन्ट्री व्हायची आणि त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. टाळ्या आणि शिट्ट्यांनी अख्खं थिएटर दणाणून जायचं.  आज राज कुमार आपल्यात नाहीत. आज  या महान अभिनेत्याचा  वाढदिवस.

राज कुमार यांचे एक ना अनेक किस्से आजही चवीने ऐकवले जातात. एक एक किस्सा ऐकताना आजही थक्क व्हायला होतं. बरखुरदार, अपने बाप से पूछना कौन हूं मैं..., असं सलमानला सुनावणारे, नाना पाटेकरांना ‘जाहिल’ म्हणणारे आणि मेरे लिए चाहे राजेंद्र कुमार हो, जीतेंद्र हो धर्मेन्द्र हो या फिर कोई बंदर हो, क्या फर्क पडता है. जानी के लिए सब बराबर है, म्हणत धर्मेन्द्र यांना डिवचणारे राज कुमार एक वेगळंच रसायन होतं. एकदा रामानंद सागर यांचाही राज कुमार यांनी असाच अपमान केला होता...

एकदा दिग्दर्शक-निर्माते रामानंद सागर एका चित्रपटाची ऑफर घेऊन राज कुमार यांच्या घरी गेले होते. खरं तर दोघांमध्ये चांगली मैत्री होती. जिंदगी व पैगाम यासारखे सिनेमे दोघांनी एकत्र केले होते. आपल्या नव्या चित्रपटातही राज कुमार यांना घेण्याची रामानंद यांची इच्छा होती. चित्रपट होता आँखे. या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन एकदिवस रामानंद सागर राज कुमार यांच्या घरी पोहोचले. राज कुमार नेहमीच्या एैटीत बसलेले होते. आधी आवभगत झाली आणि ठरल्याप्रमाणे रामानंद सागर यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट राज कुमार यांच्याकडे दिली. मानधन म्हणून दहा लाख देण्याची तयारीही दर्शवली. पण राजकुमार यांना स्क्रिप्ट आवडली नाही. अशावेळी स्पष्ट नकार दिल्या गेला असता. पण राज कुमार मोठा मूडी माणूस. त्यानं काय केलं तर आपल्या पाळीव कुत्र्याला हाक मारली.कुत्रा लगेच शेपूट हलवत राज कुमार यांच्या पुढ्यात येऊन उभा झाला. यानंतर तर राज कुमार यांनी कमालच केली. ‘रामानंदजी नयी फिल्म लेकर आयें है, क्या राय है, फिल्म करे,’ असा प्रश्न त्यांनी चक्क कुत्र्याला विचारला.  तो मुका प्राणी बिचारा काय बोलणार, तो गप्पगुमानं आला आणि राज कुमार यांच्या पायाशी जावून बसला. ते पाहून, ‘देखा,ये रोल तो मेरा कुत्ता भी नहीं करना चाहेगा. ऐसें में हां करने का सवाल ही नहीं उठता,’ असं राजकुमार म्हणाले.रामानंद सागर यावर काहीही बोलले नाहीत. ते उठले आणि तडक बाहेर पडले. पण हा अपमान ते कधीच विसरू शकले नाहीत. पुढे त्यांनी कधीच राज कुमार यांचं तोंडही पाहिलं नाही.  धर्मेन्द्रला घेऊन रामानंद सागर यांनी ‘आँखे’ हा सिनेमा बनवला. सिनेमा तो तुफान हिट झाला. पण संबंध बिघडले ते बिघडलेच...

जंजीरला असा दिला होता नकार...‘जंजीर’ या चित्रपटाबद्दलचा एक किस्साही असाच. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना ‘जंजीर’ या चित्रपटात राज कुमार हवे होते. या चित्रपटाची ऑफर घेऊन ते राज कुमार यांच्याकडे पोहोचले. पण प्रकाश मेहरा यांच्या हेअर ऑईलने राज कुमार इतके त्रासले की यासाठी त्यांनी थेट ‘जंजीर’ हा सिनेमाच नाकारला. आपका बिजनौरी तेल बहुत ही अजीब तरह से महक रहा है, आपके साथ फिल्म करना तो दूर, मैं आपके साथ एक पल खडा होना भी बर्दाश्त नहीं कर सकता, असं त्यांनी मेहरा यांना सुनावलं होतं.

टॅग्स :राज कुमारबॉलिवूड