Join us  

"3 Idiots मधील सीन करताना आम्ही नशेत होतो", १५ वर्षांनंतर आर माधवनने सांगितला शूटिंगचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 10:55 AM

3 Idiots सिनेमाच्या शूटिंगवेळी नशेत होते आर माधवन, आमिर आणि शरमन जोशी; अभिनेत्याचा खुलासा

अनेक गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'थ्री इडियट्स'(3 Idiots) हा सिनेमा. २००९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांच्या मुख्य भूमिका होत्या. तीन मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या सिनेमातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 

'थ्री इडियट्स'मधील अनेक सीन्सही गाजले होते. कॉमेडीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या 'थ्री इडियट्स'मध्ये राजू, फरहान आणि रँचो दारू पिऊन प्राध्यापक असलेल्या व्हायरसच्या घरी जातात असा सीन होता. या सीनवेळी आमिर, आर माधवन आणि शरमन खरंच दारू प्यायले होते, अशी चर्चा होती. आर माधवनने बिअर बायसेप्सला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, "हो हे खरं आहे. ही आमिरची कल्पना होती. नशेत असल्याचे सीन्स करताना त्याचा अभिनय नाही केला पाहिजे.  तर अशा सीन्ससाठी खरंच दारू पिऊन नॉर्मल असल्यासारखा अभिनय केला पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं."

रात्री ९ वाजता शूटिंग होतं. त्यामुळे रात्री ८ वाजता दारू पिण्याचं प्लॅनिंग केल्याचंही आर माधवनने सांगितलं. "हवामान खराब असल्यामुळे शूटिंगला उशीर झाला. पण, त्यामुळे आम्हाला जास्त मजा येत होती. आम्ही पूर्णपणे नॉर्मल राहण्याचा विचार केला होता. पण, डायलॉग बोलायला आम्ही खूप वेळ घालवला होता. याची आम्हाला कल्पनाही नव्हती," असंही माधवनने सांगितलं. 

दरम्यान, सध्या आर माधवन त्याच्या 'शैतान' या सिनेमामुळे चर्चेत आहे. ८ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. आर माधवनसह या सिनेमात अजय देवगण, ज्योतिका, जानकी बोडीवाला यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :आर.माधवनआमिर खानशरमन जोशीसिनेमा