Join us  

या कारणामुळे अभिनेता Prateik Babbar विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:21 PM

मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीकविरोधात वेगाने कार चालवून एका स्कुटरला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अभिनेता प्रतीक बब्बरच्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नुकतीच गोव्यात घडली आहे.  मोटार वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीकविरोधात वेगाने कार चालवून एका स्कुटरला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रतीक हा बॉलीवूड मधील अभिनेता असण्यासोबतच प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. राज बब्बर हे काँग्रेसचे नेते आहेत. 

२१ वर्षीय पाओलो कोरिया याने पोलिसांकडे प्रतीक विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा तरुण गोव्यातच राहणारा असून त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘प्रतीक भरधाव वेगात गाडी चालवत होता. गोव्यातील पोर्वोरीम पोलीस स्थानकाजवळील रस्त्यावर त्याने माझ्या दुचाकीला धडक दिली. आम्हाला धडक दिल्यानंतर आमची माफी मागण्याऐवजी त्याने मला आणि माझ्या बहिणीला धमकी दिली.’ 

प्रतीकला अपघातानंतर वैद्यकीय तपासणीकरता रुग्णालयात नेण्यात आले असता त्याने रक्त काढण्यास मनाई केली असल्याचे इन्स्पेक्टर परेश नाईक यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. 

पाओलोने प्रतीक विरोधात तक्रार दाखल केली असली तरी प्रतीकनेही या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा अपघात झाल्यानंतर पावलाने प्रतीकच्या  कारची काच फोडल्याचा आरोप त्याने केला आहे.

प्रतीकने प्रल्हाद कक्कर यांच्याकडे सहायक म्हणून त्याच्या करियरची सुरुवात केली. अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तो बॉलीवूडकडे वळला. त्याने जाने तू या जाने ना या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने धोबी घाट, दम मारो दम, बागी २, मुल्क यांसारख्या चित्रपट काम केले आहे. 

प्रतीक त्याच्या अभिनयापेक्षा विवादांमुळेच नेहमी चर्चेत असतो. एकेकाळी तो ड्रगसच्या अधीन गेला होता. त्यानेच ही गोष्ट मीडियामध्ये सांगितली होती. त्याने सांगितले होते की, ‘बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशामुळे आणि अभिनेत्री एमी जॅक्सन हिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे मी पूर्णपणे हतबल झालो होतो. पुढे मी ड्रग्जच्या अधीन गेलो. मला ड्रग्जची अत्यंत वाईट सवय लागली; मात्र आता मी यातून पूर्णपणे रिकव्हर झालो असून, आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करीत आहे. प्रतीकने पुढे बोलताना सांगितले की, ड्रग्जच्या अधीन जाणे ही माझी सर्वस्वी चूक आहे. कारण ड्रग्ज ही माझी पर्सनल चॉइस होती.  

टॅग्स :प्रतीक बब्बर