Join us

भारतात परतल्यावर ऋषी कपूर यांना सर्वात आधी पाहायचंय लेकाचं लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:37 IST

होय, भारतात परतल्यावर सर्वप्रथम ऋषी कपूर यांना लेकाचे लग्न बघायचे आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न ही त्यांची पहिली सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांत रणबीर व आलिया दोघांच्याही कुटुंबात कमालीची जवळीक पाहायला मिळतेय. आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे खुद्द आलियाचे डॅडी महेश भट्ट यांनीही मान्य केले आहे.

गत सहा महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार आहेत. ऋषी कपूर यांचे शेजारी मधु पोपलई यांच्या हवाल्याने आलेल्या बातमीनुसार, ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून ते लवकरच मुंबईत परतणार आहेत. नीतू कपूर यांनीही सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये ऋषी कपूर या महिन्याच्या अखेरिस भारतात परतत असल्याचे संकेत दिले आहेत. आता यापुढची एक बातमी आहे. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात परतल्यावर सर्वप्रथम ऋषी कपूर यांना लेकाचे लग्न बघायचे आहे.

होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न ही त्यांची पहिली सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. सूत्रांचे खरे मानाल तर, मुंबईत आल्यानंतर ऋषी कपूर सर्वप्रथम आलियाच्या कुटुंबाला भेटून लग्नाची बोलणी करतील. यानंतर शुभमुहूर्तासाठी भटजींना भेटण्याचीही त्यांची योजना आहे. भटजींना भेटण्यासाठी एप्रिलमधील एक तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीरच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. लेकाने लवकरात लवकर लग्न करावे, अशी ऋषी कपूर यांची मनापासून इच्छा आहे.

गेल्या काही दिवसांत रणबीर व आलिया दोघांच्याही कुटुंबात कमालीची जवळीक पाहायला मिळतेय. आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे खुद्द आलियाचे डॅडी महेश भट्ट यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे या वर्षांत हे लग्न होईल, याची शक्यता वाढली आहे. अलीकडे करण जोहरने एका इव्हेंटमध्ये यावरून रणबीर व आलियाची फिरकी घेतली होती. सध्या अनेकजण रणबीर व आलियाला लवकरात लवकर लग्न करण्याचा सल्ला देत आहेत. कारण तुम्ही रणबीर कपूरला ओळखत नाही, तो कधीही हातचा जावू शकतो, असे करण म्हणाला होता. यावर आलिया व रणबीर दोघेही हसत सुटले होते.

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूरआलिया भट