Join us  

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या 'द व्हॅक्सीन वॉर'चं PM मोदींकडून तोंडभरून कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 5:20 PM

विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर'चं मोदींनी केलं कौतुक, म्हणाले, "हा चित्रपट पाहिल्यानंतर..."

विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाइल्स'नंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. करोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं होतं. पण, प्रेक्षकांच्या अपेक्षेस हा चित्रपट खरा उतरला नाही. त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. 

बॉक्स ऑफिसवरही अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' फार चांगली कमाई करू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या अग्निहोत्रींच्या या चित्रपटाचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.  जोधपूरमधील एका कार्यक्रमात मोदी म्हणाले, "द व्हॅक्सीन वॉर चित्रपटाबद्दल मी ऐकलं. कोव्हिड-१९ प्रतिबंधक लस शोधण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी दिवस-रात्र मेहनत केली. या सगळ्या गोष्टी या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. आपल्या वैज्ञानिकांची गोष्ट या चित्रपटातून मांडल्याबद्दल आणि त्यांना महत्त्व दिल्याबद्दल मी चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन करतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल."

दरम्यान, 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात केवळ ८ कोटींचा गल्ला जमवता आला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीनरेंद्र मोदीसेलिब्रिटी