Join us  

‘पीएम नरेंद्र मोदी’त बोमन इराणींची एन्ट्री, साकारणार हे पात्र!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 1:38 PM

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे लोकांना कळले. आता या चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देया चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या राजकिय जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.  

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आणि सर्वाधिक चर्चा रंगली ती चित्रपटातील विविध पात्रांची. नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे लोकांना कळले. आता या चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. होय, या चित्रपटात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे पात्र असणार आहे. हे पात्र अभिनेता बोमन इराणी साकारणार आहे.

 ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी इरानींचे काही फोटो शेअर करत याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. खुद्द बोमन इराणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘मी रतन टाटांसारखा दिसतो, असे अनेक लोक मला म्हणतात. पडद्यावर रतन टाटांची भूमिका साकारायला मिळाली तर, असा विचार त्यामुळेच अनेकदा माझ्यात मनात येत असे आणि याचदरम्यान मला या भूमिकेसाठी बोलवण्यात आले. चित्रपटात माझी भूमिका छोटीशी आहे. पण तितकीच महत्त्वाची आहे. मी लगेच या भूमिकेसाठी होकार कळवला,’असे बोमन यांनी सांगितले.

रतन टाटांची भूमिका बोमन इराणी साकारणार, हे कळताच चाहते खूश झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी नरेंद्र मोदींची भूमिका विवेक ओबेरॉय साकारणार म्हटल्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. तुम्हाला ठाऊक आहेच की, या चित्रपटात पीएम मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची भूमिका अभिनेत्री जरीना वहाब साकारणार आहे.  मोदींच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट जिवंत करणार आहे. तर मनोज जोशी अमित शहांच्या भूमिकेत असणार आहेत. ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट अनेक भाषांत रिलीज होणार आहे.  या चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या राजकिय जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.  

टॅग्स :बोमन इराणीपी. एम. नरेंद्र मोदी