Join us  

कोरोना लॉकडाऊन : हजारो मैल पायपीट करणा-या मजुरांची व्यथा दिसणार पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 5:01 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्माता दिग्दर्शकांनी चित्रपटांची तयारी सुरु केली आहे. पण...

कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग अक्षरश: थांबले आहे. देशातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाल्याने हातावर पोट असणारे अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. वाहतुकीचे कोणतंही साधन उपलब्ध नसल्याने अनेकांनी  300  ते 500 किमी अंतर चालत  घरी पोहोचण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. या कामगारांचे काळीज चिरणारे फोटो आपण पाहिलेत. आता हे फोटो चित्रपटाच्या रूपात लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. होय, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापडी  लॉकडाऊनच्या काळातील या कामगारांची व्यथा मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत.अमर उजालाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्माता दिग्दर्शकांनी चित्रपटांची तयारी सुरु केली आहे. पण ‘पीहू’ सारखी उत्तम कलाकृती साकारणारे दिग्दर्शक विनोद कापडी यांनी कोरोना नाही तर कोरोनामुळे स्थलांतर करण्यास भाग पडलेल्या गरीब मजुरांची व्यथा पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोद यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शॉर्ट व्हिडीओजची एक संपूर्ण सीरिज पोस्ट केली आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले, हे व्हिडीओ म्हणजे टप्प्याटप्प्याने साकारलेले लघुपट होते. पण आता मी यावर एक चित्रपट बनवण्याचा विचार करतोय. हा चित्रपट मी ओटीटीवर कमर्शिअली रिलीज करणार. लॉकडाऊन आणि हजारो कामगारांचे स्थलांतर या घटनेने मला हा चित्रपट बनण्यासाठी प्रेरित केले आहे. मी यावर कामही सुरु केले आहे.सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत विनोद यांनी दिल्लीतून कानपूरकडे निघालेल्या एका कुटुंबाची व्यथा आणि कथा दाखवली आहे. कामधंदे बंद झाल्याने या कुटुंबाने दिल्लीहून कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला. ते सुद्धा शेकडो किमीची पायपीट करून.

टॅग्स :बॉलिवूड