Payal Ghosh On Cancelling Turkey Trip: काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण भारत देश हादरला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये जो संघर्ष निर्माण झाला, त्यामध्ये तुर्की या देशानं पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणं पसंत केलं. त्यांच्या या भारतविरोधी भूमिकेमुळे भारतीयांनी सोशल मीडियावर तुर्कीच्या विरोधात भूमिका घेत बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली. 'बॉयकॉट तुर्की' हा ट्रेंड सुरू झाला. फक्त सामान्य नागरिक नाही तर अनेक कलाकारांनीदेखील या देशांमध्ये फिरायला जाणं रद्द केलं आहे. नुकतंच अभिनेत्री पायल घोष हिनेदेखील ३० लाख रुपयांची ऑफर धुडकावून लावली आहे.
पायल घोष हिला ३० लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. पण, तरीही तिने तुर्कीला जाण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. आयएएनएसशी झालेल्या संभाषणात ती म्हणाली, 'पैसा देशाच्या सन्मान आणि अभिमानापेक्षा वर असू शकत नाही. मी प्रथम भारतीय आहे, नंतर अभिनेत्री किंवा कलाकार. जसे आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, त्याचप्रमाणे पाठीत वार आणि पर्यटकांच्या भेटी आणि मनोरंजन एकत्र होऊ शकत नाही".
पुढे पायल घोष म्हणाली, "जर तुर्कीने महत्त्वाच्या वेळी पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तर ते आपल्या भारतीयांकडून पर्यटन किंंवा सेलिब्रिटींच्या स्वरूपात कमाईची अपेक्षा करू शकत नाहीत. मी माझ्या निर्णयाबद्दल अगदी स्पष्ट आहे,. म्हणून मी तुर्कीला जाण्याचा माझा बेत रद्द केला. देवाच्या कृपेने, मला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. मी पैशासाठी माझ्या देशाला कधीही मागे ठेवू शकत नाही. जय हिंद!".
फक्त पायल घोष हीच नाही तर मराठमोळा गायक राहुल वैद्य यानेदेखील तुर्कीमध्ये होणारं कॉन्सर्ट रद्द केलंय. 'सर्वात आधी देश' अशी प्रतिक्रिया त्याने दिली. तो म्हणाला, "ही ऑफर खूपच चांगली होती. ते मला कॉन्सर्टसाठी ५० लाख देणार होते. पण मी म्हटलं की कोणतंही काम, पैसा, आणि प्रसिद्धी देशासमोर मोठं नाही. त्यांनी मला याहीपेक्षा जास्त पैसे ऑफर केले पण मी स्पष्ट नकार देत हे पैशांसंदर्भात नाही असं सांगितलं.
कोण आहे पायल घोष?पायल घोष ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, कन्नड आणि तेलुगु चित्रपटांत काम केलं आहे. पायल तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.