Join us

एकेकाळी बार डान्सर असलेल्या ‘या’ तरुणीने बॉलिवूडमध्ये मिळविले स्थान, वाचा तिची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2018 18:24 IST

एकेकाळी बार डान्सर असलेल्या शगुफ्ता रफिकची कथा एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच आहे, आज तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

भट्ट कॅम्पसाठी अनेक चित्रपटांच्या कथा लिहिणारी शगुफ्ता रफिक हिने आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष केला. इमरान हाशमी, शमिता शेट्टी आणि उदिता गोस्वामी स्टारर ‘वो लम्हे’ या चित्रपटाचे स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स लिहिणारी शगुफ्ता एकेकाळी बार डान्सर होती. शगुफ्ताने बॉलिवूडपर्यंतचा प्रवास खूपच संघर्षपूर्ण पार केला. तिने ‘आवारापन, राज, मर्डर-२ आणि आशिकी-२’ यांसारख्या चित्रपटांच्या कथा लिहिल्या. मात्र तिची रिअल लाइफ स्टोरीदेखील एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. लहानपणापासूनच अनाथ असलेली शगुफ्ता अनवरी बेगमला सापडली होती. अनवरीने तिचा सांभाळ करून तिला मोठे केले. मात्र यादरम्यान तिच्या आयुष्यात असे काही घडले की, तिला दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड झाले होते. याचवेळी अनवरीने तिचे दागिने विकून तिचा सांभाळ केला. मात्र काही काळानंतर पुन्हा एकदा तिची आर्थिक परिस्थिती खालावली. हे बघून शगुफ्ताने अनवरीचा आधार बनण्याचे ठरविले. यादरम्यान, बारा वर्षीय शगुफ्ताला प्रायव्हेट पार्ट्यांमध्ये डान्स करण्याचे काम मिळाले. या पार्ट्या मोठ्या स्तरावरील असायच्या. याठिकाणी श्रीमंत लोक आपल्या गर्लफ्रेंड आणि वारंगणांसोबत येत असायच्या. शगुफ्ताला डान्ससाठी चांगले पैसे मिळायचे. याच पैशांवरून तिचा घरखर्च चालायचा.  पुढे १७ व्या वर्षी शगुफ्ता वेश्यावृत्तीकडे वळली. काही काळ तिने हे काम करून पैसे मिळविले. त्यानंतर शगुफ्ता दुबईला गेली. त्याठिकाणीदेखील तिने डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिला चांगले पैसे मिळू लागले. याचदरम्यान तिच्या आईची प्रकृती खालावली. तिने सर्व काही सोडून आपल्या आईकडे येणे योग्य समजले. तिच्या आईला कॅन्सर झाल्याचे समोर आले. काही काळानंतर तिचे निधन झाले.  त्यानंतर शगुफ्ताची भेट निर्माता महेश भट्ट यांच्याशी झाली. महेश भट्ट यांनी तिला काम करण्याची संधी दिली. शगुफ्तानेदेखील भट्ट कॅम्पमध्ये एंट्री घेत संधीचे सोने केले. तिने लेखिका बनणे पसंत करीत त्यादृष्टीने तयारी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार तिने ‘वो लम्हे’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्धही केले. पुढे तिने महेश भट्टसाठी बरेचशा चित्रपटांच्या कथा लिहिल्या. शगुफ्ताने आतापर्यंत ‘आवारापन, शोवबीज, राज, जश्न, कजरारे, मर्डर-२, जन्नत, जिस्म-२, राज-२, आशिकी-२, मिस्टर एक्स, अंकुर अरोरा मर्डर केस, हमारी अधुरी कहानी, अलोन, पंजाबी चित्रपट दुश्मन तसेच तेलगू चित्रपटाच्याही कथा तिने लिहिल्या. त्याचबरोबर तिने काही टीव्ही मालिकांसाठीही काम केले. आज शगुफ्ताने इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.