बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची साठी पार केली तरी त्या एकदम फिट दिसतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. वयाच्या ६६व्या वर्षीही नीना गुप्ता तितक्याच सुंदर आणि तंदुरुस्त आहेत. अनेक तरुणींना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. नीना गुप्तांचा फिटनेस पाहून चाहतेही आश्चर्यचकित होतात. पण, अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. अशाच ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्तांनी चोख उत्तर दिलं आहे.
नीना गुप्ता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावरुन त्या चाहत्यांना अपडेट्स देत असतात. नुकतंच नीना गुप्तांनी एओअरपोर्टवरील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्या म्हणतात की, "फ्लाइट लेट होतात त्यामुळे मी असा डबा घेऊन येते. बाहेरचं खाणं कसं असतं माहीत नाही. त्यामुळे मी हा रोटी रोल घरून घेऊन येते. यामध्ये बटाटा, पनीर, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो आहे".
नीना गुप्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. काहींनी त्यांचं कौतुक केलं होतं. तर काहींनी त्यांना ट्रोल केलं होतं. एका महिलेने कमेंट करत "खूप छान, फक्त एक विनंती होती की तुमचे पाय दाखवू नका. अशाप्रकारे आजीबाई पाय दाखवताना आम्ही कधी पाहिलेलं नाही. सुंदररित्या तुम्ही वृद्ध होत आहेत ही चांगली गोष्ट आहे", असं म्हटलं होतं. आणखी काहींनी अशा कमेंट्स केल्या होत्या.
एका महिलेनेच नीना गुप्तांबाबत केलेली अशी कमेंट पाहून चाहता भडकला. तो म्हणाला, "एक महिलाच दुसऱ्या महिलेला असं बोलत आहे. बॉडी शेमरचं काम केल्याबद्दल तुमचं अभिनंदन". त्याच्या या कमेंटवर नीना गुप्तांनी कमेंट करत रिप्लाय दिला आहे. "काळजी करू नका. जे लोक अशा पद्धतीने कमेंट करतात ते माझ्यावर जळतात. कारण, त्यांच्याकडे माझ्यासारखा फिटनेस नाही. त्यामुळे दुर्लक्ष करा", असं म्हणत नीना गुप्तांनी सणसणीत चपराक लगावली आहे.