Join us

शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले, "आजच्या आधुनिक पिढीला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:36 IST

शरद पवारांनी ट्विट करत चित्रपट पाहिल्याची माहिती दिली.

Sharad Pawar Watched Phule Movie: स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा व सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'फुले' चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्नी प्रभाताई पवार यांच्यासह थिएटरमध्ये जाऊन 'फुले' चित्रपट पाहिला आहे.  तसेच चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी सोशल मीडियावर चित्रपट पाहिल्याची माहिती दिली.  त्यांनी यासंदर्भात फोटो शेअर केले आहेत. यासोबतच ट्विटमध्ये त्यांनी लिहलं,"ज्यांनी महाराष्ट्राला समता, बंधुता, सामाजिक न्याय व स्त्री शिक्षणाचा मूलगामी विचार दिला, त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित 'PHULE' या चित्रपटाच्या विशेष शोस उपस्थित राहण्याचा योग आला".

पुढे त्यांनी आधुनिक पिढीला उद्देशून लिहलं, "आजच्या आधुनिक पिढीला समाजातील रूढी-परंपरांचा वास्तव आणि त्या परंपरांचा अंधकार दूर करण्यासाठी समाजसुधारकांनी दिलेला संघर्ष समजावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेली 'फुले' चित्रपटाची निर्मिती ही अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी बाब आहे", असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, 'फुले' चित्रपटात प्रतिक गांधी (Pratik Gandhi) यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर पत्रलेखा (Patralekha) यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. दोघांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.  गेल्या कित्येक वर्षांपासून या सिनेमाचं काम सुरू होतं. झी स्टुडियोची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे.

टॅग्स :शरद पवारपत्रलेखा