Join us  

इरफान खानच्या आठवणीने भावूक झालेत नसीरूद्दीन शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 4:06 PM

त्याच्याकडे देण्यासारखे खूप काही होते. आपण पाहिले ते केवळ हिमनगाचे एक टोक होते....

ठळक मुद्देइरफानसोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख त्यांनी यात केला आहे.

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याचे कॅन्सरने गत 29 एप्रिलला निधन झाले. इरफानच्या अकाली निधनाने सगळेच हळहळले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. इरफान आपल्यातून गेलाय, हे अद्यापही मन मानायला तयार नाही. ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही, नसीरूद्दीन यांनी ‘द हिंदू’ या दैनिकात इरफानवर एक भावूक लेख लिहिला आहे. इरफानसोबतच्या पहिल्या भेटीचा उल्लेख त्यांनी यात केला आहे.

ते लिहितात, ‘मृत्यू हा आयुष्याचा अटळ भाग आहे, यावर मला जराही शंका नाही. तुम्ही कधी मरणार, कसे मरणार, हे महत्त्वाचे नाही़ तर मरण्यापूर्वी आयुष्यात तुम्ही काय केले, हे अधिक महत्त्वाचे आहे, इरफानने त्याच्या आयुष्यात खूप काही मिळवले, कमावले. त्याच्याकडे देण्यासारखे खूप काही होते. आपण पाहिले ते केवळ हिमनगाचे एक टोक होते. उपचारादरम्यान त्याला असह्य वेदना होत. पण त्याने त्या वेदनांचा कधीच बाऊ केला नाही. शरीरात इतक्या वेदना होऊ शकतात, याचे मला आश्चर्य वाटते, असा तो म्हणायचा. मी वेदना भोगतोय, असे कधीच त्याच्या तोंडून मी ऐकले नाही. किती लोकांना चोरपावलांनी येणा-या मृत्यूला पाहता येतं, मला ती संधी मिळालीय, मी भाग्यवान आहे, असे तो मला म्हणाला, तेव्हा मी अंतर्बाह्य हादरलो होतो.

त्याची माझी पहिली भेट अनपेक्षित होती. एकदिवस मी घरी परतलो तेव्हा रत्ना एका किरकोळ शरीरयष्टीच्या व्यक्तिसोबत बसून गप्पा मारत असताना मला दिसली. त्यांची कुठल्या तरी टीव्ही फिल्मसाठी तालीम सुरु होती. त्यादिवशी मी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो. इरफानच्या प्रत्येक गोष्टीत बुद्धिमत्ता झळकायची. तो आज आपल्यात नाही पण त्याच्यासारखा कलाकार होणे नाही. तो एक सच्चा कलाकार होता, एवढेच मी त्याच्याबद्दल म्हणेल.

टॅग्स :नसिरुद्दीन शाहइरफान खान