Join us  

मेरा शानू चला गया...! श्रवण राठोड यांच्या निधनाची बातमी ऐकून ढसाढसा रडले नदीम सैफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:20 AM

Shravan Rathod's demise:: नदीम-श्रवण या जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री कोरोनाने निधन झाले... अंतिम संस्काराला जाऊ शकणार नाही पत्नी व मुलगा...

ठळक मुद्देनदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

नदीम-श्रवण (Nadeem Shravan)या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री कोरोनाने निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री 9.30 च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नदीम यांना तर मोठा धक्का बसला आहे. श्रवण यांच्या निधनामुळे नदीम कोलमडले आहेत. डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत. (Shravan Rathod Died)

 मेरा शानू चला गया...बॉम्बे टाइम्ससोबत फोनवर बोलताना नदीम यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मित्राच्या निधनानंतर ते फोनवरच ढसाढसा रडले़ मेरा शानू चला गया... मेरा शानू नहीं रहा... असे म्हणत त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. आम्ही अख्खे आयुष्य सोबत घालवले. यश-अपयश सोबत अनुभले़ एकमेकांसोबत शिकलो. आम्ही कधीच एकमेकांना एकमेकांपासून दूर होऊ दिले नाही. पण आता मृत्यूने श्रवणला माझ्यापासून हिरावून घेतले.  या कोरोना काळात त्याला अंतिम निरोप द्यायलाही मी जाऊ शकत नाही, याचे दु:ख आहे, असे नदीम म्हणाले. हे सांगताना त्यांना भरून आले.

अंतिम संस्काराला जाऊ शकणार नाही पत्नी व मुलगाश्रवण राठोर यांच्या अंतिम संस्कारात त्यांची पत्नी व मुलगा संजीव राठोरही उपस्थित राहू शकणार नाहीत. कारण या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे, दोघेही रूग्णालयात भरती आहेत.

श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांनाही संसर्ग झाला होता. नदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होते. नदिम श्रवण यांच्या जोडीने दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, धडकन, राजा, परदेस, दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सगळीच गाणी आजही हिट आहेत. 

टॅग्स :बॉलिवूड