Join us  

"मी जिवंत आहे", 'मदर इंडिया' फेम अभिनेत्याच्या निधनानंतर साजिद खानने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 1:26 PM

'मदर इंडिया' फेम अभिनेत्याच्या निधनानंतर मात्र बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. 

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचं बुधवारी (२७ डिसेंबर) रात्री निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. मात्र, अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 'मदर इंडिया' फेम अभिनेत्याच्या निधनानंतर मात्र बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. 

मदर इंडिया फेम साजिद खान आणि 'हाऊसफुल'चे दिग्दर्शक साजिद खान यांच्या नावात साम्य असल्यामुळे काही चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर दिग्दर्शक साजिद खानला व्हिडिओ शेअर करत जिवंत असल्याचं सांगावं लागलं. साजिद खान यांनी इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत हा चाहत्यांमधील संभ्रम दूर केला आहे. "१९५७मध्ये मदर इंडिया सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात ज्या छोट्या मुलाने सुनिल दत्त यांची भूमिका साकारली होती. त्याचं नाव साजिद खान आहे. त्यांचा जन्म १९५७मध्ये झाला होता. त्याच्यानंतर २० वर्षांनी माझा जन्म झाला आहे. त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो," असं त्याने व्हिडिओत म्हटलं आहे. 

"पण काही लोकांनी शहानिशा न करता माझा फोटो लावला. मला काल रात्रीपासून फोन, मेसेज येत आहेत. पण, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी जिवंत आहे. मला अजून तुमचं मनोरंजन करायचं आहे," असंही पुढे त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. 

दरम्यान, मेहबूब खानच्या 'मदर इंडिया' या चित्रपटात बिरजूच्या पात्राची छोटी भूमिका साकारल्यानंतर साजिद खान यांना प्रसिद्धी मिळाली होती. 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समधूनही त्यांनी प्रसिद्धी मिळवली. याशिवाय अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्ये ते पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी नोरा अनोरसोबत 'द सिंगिंग फिलिपिना', 'माय फनी गर्ल' आणि 'द प्रिन्स अँड आय' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही काळानंतर ते चित्रपट सृष्टीपासून दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतले होते.  

टॅग्स :साजिद खानसेलिब्रिटी