Join us

लग्नापूर्वी रणबीर कपूर लेडी लव्ह आलिया भटसाठी उभारतोय स्वप्नातलं आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 17:57 IST

रणबीर आलियासाठी आलिशान घर साकारण्यात सध्या व्यस्त आहे.

बी-टाऊनमधलं क्युट कपल म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर. गेल्या २ वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असते. त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. रणबीरच्या मनातदेखील अशीच इच्छा असावी कारण तो त्यांचे स्वप्नातलं घर साकारण्यात बिझी असल्याचे दिसते आहे. यावरून ते लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहिर करतील, असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत.

रणबीर खास आलियासाठी आलिशान घर साकारण्यात गुंतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरला त्यांच्या घरात आलियाचा एक मोठा कॅनव्हास फोटो लावायचा आहे. ज्यात आलियाचे अनेक कॅण्डीड फोटो असतील. रणबीरची ही मागणी पूर्ण करण्यासाठी इंटेरिअर डिझायनर प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. इतकंच नाही तर, आलियाच्या अनेक फोटोंना एकत्र करून मोझॅक टाइल्समध्ये लावले जात आहेत. त्यामुळे घराची शोभा तर वाढणार आहे, शिवाय त्यातून रणबीरचे आलियावरील प्रेम व्यक्त होणार आहे.

आलियादेखील घराचा एक खास कोपरा सजवत आहे. जिथे ती रणबीर आणि त्याच्या कुटुंबांचे जुने फोटो लावणार आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि घरात आपलेपणा आणण्यासाठी ती हे करणार असल्याचे बोलले जाते आहे. रणबीरने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना म्हटले होते की, 'जर लॉकडाउन झाले नसते, तर आम्ही या आधीच लग्न केले असते. मी लवकरच या नात्याला पूर्णत्वाला नेणार आहे. मी या नात्याबद्दल जास्त काही बोलून नात्यातील गोडवा कमी करू इच्छित नाही.'

सध्या रणबीर आणि आलियाच्या घराचे काम जोरात सुरू असून काही दिवसांपूर्वी त्या दोघांना नीतू कपूरसोबत त्यांच्या घराची पाहणी करताना पाहिले गेले होते. रणबीर आणि आलियाचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट