Join us

"दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ...", माधुरी दीक्षितच्या रीलची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 16:34 IST

"गुलाबी साडी" गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते. ९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी माधुरी आजही तितकीच ग्लॅमरस दिसते. अभिनयाबरोबरच माधुरीच्या डान्सचीही चर्चा होते. माधुरी तिच्या डान्सने आजही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. माधुरीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 

माधुरी दीक्षित अनेक ट्रेंडिंग गाण्यांवर रील बनवताना दिसते. अनेकदा हिंदीबरोबरच मराठी गाण्यावरही माधुरी थिरकताना दिसते. आताही माधुरीच्या एका रील व्हिडिओची चर्चा रंगली आहे. माधुरीला सध्या एका मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. तिने रीलवर ट्रेडिंग असलेल्या "गुलाबी साडी" या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत माधुरीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. इंडो वेस्टर्न लूक करून माधुरीने गुलाबी साडी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या या रील व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.  या व्हिडिओला तिने "राजा फोटो माझा काढ" असं कॅप्शन दिलं आहे.

माधुरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या माधुरी डान्स दिवाने या रिएलिटी शोचं परिक्षण करत आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटी