Join us  

हृदयद्रावक! मधुबाला यांच्या 96 वर्षीय बहिणीला सुनेनं काढलं घराबाहेर; व्यथा ऐकून हेलावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 2:12 PM

Madhubala Sister Kaniz Balsara : कनीज बलसारा यांच्या सुनेने समीनाने त्यांना घराबाहेर काढलं. तसेच समीनाने त्यांना मुंबईला येणाऱ्या विमानात बसवून दिले.

नवी दिल्ली - सौंदर्याचे दुसरे नाव म्हणजे, मधुबाला.मधुबाला य़ांनी एकेकाळी आपल्या अभिजात सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं. अभिनयानेही सिनेप्रेमींना भुरळ पाडली. मात्र आता मधुबाला यांच्या एका 96 वर्षीय बहिणीबाबत एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. म्हातारपणात सुनेने त्यांना घराबाहेर काढलं आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं आहे. मधुबाला यांची मोठी बहीण कनीज बलसारा (Madhubala Sister Kaniz Balsara) या त्यांच्या मुलगा आणि सुनेसोबत न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे राहत होत्या. परंतु कनीज बलसारा यांच्या सुनेने समीनाने त्यांना घराबाहेर काढलं. तसेच समीनाने त्यांना मुंबईला येणाऱ्या विमानात बसवून दिले. 29 जानेवारी रोजी त्या एकट्या मुंबईला आल्या. 

ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, कनीज या आपल्या पतीसोबत 17-18 वर्षांपूर्वीच न्यूझीलंडला गेल्या होत्या. कनीज यांची भाची परवेझ यांनी तिथे माझा भाऊ फारुख राहतो. फारुखवर खूप जीव होता. ती त्याच्याशिवाय राहूच शकत नव्हती. भावाचेही आईवर खूप प्रेम होते. त्यामुळे तो आई-वडिलांना घेऊन न्यूझीलंडला गेला. न्यूझीलंडमध्ये फारुखला मोठा मान होता. तो तिथल्या करेक्शन विभागात वरिष्ठ पदावर काम करायचा. आईवडिलांनी तिथे जाणे समीनाला आवडलं नव्हतं. तिला हे दोघेजण अजिबात आवडत नव्हते असं म्हटलं आहे. परवेझ यांनी पुढे सांगितले की, आईवडील जेव्हापासून तिथे गेले तेव्हापासून समीनाने त्यांच्यासाठी कधीच जेवण बनवले नाही. 

"माझा भाऊ फारुख त्यांच्यासाठी हॉटेलमधून जेवण मागवायचा. या दोघांना तेच जेवण जेवावा लागायचं. समीना आणि फारुखच्या मुलीचं ऑस्ट्रेलियात लग्न झालं. परंतु फारुखची मुलगी देखील तिच्या आजी-आजोबांशी कधी प्रेमाने वागली नाही. सासूला घराबाहेर काढलं. हे अतिशय वेदनादायी आहे. समीनाने आमच्या एका नातेवाईकांना फोन करून माझ्या आईला विमानात बसवून दिल्याचे सांगितले. ते देखील विमान मुंबईत दाखल होण्यासाठी आठ तास बाकी असताना. त्या नातेवाईकाने मला २९ जानेवारीला दुपारी १२ च्या सुमारास फोन केला. तेव्हा मी मुंबईत नव्हते. पालघरला होते. मी धावतपळत मुंबईला आले आणि तडक विमानतळावर गेले."

परवेझ यांनी पुढे जे सांगितलं ते अतिशय धक्कादायक होते. त्यांनी सांगितले, "जेव्हा त्या मुंबई विमानतळावर उतरल्या तेव्हा आरटीपीसीआर करण्यासाठी लागणारे पैसे देखील नव्हते. मी आतमधील एका व्यक्तीला पैसे पाठवले आणि त्यांची टेस्ट झाली. मी जेव्हा तिला भेटले तेव्हा तिने मला आधी विचारले की, बाळा तुला माहिती आहे ना फारुख हे जग सोडून गेला ते... मी त्याला कबरीमध्ये सोडून आले आहे... आता मला खूप भूक लागली आहे... तू मला काही खायला देशील का? त्यांचे हे बोलणे ऐकून मला मोठा धक्का बसला." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :मधुबाला