Join us  

करीनाच्या 'बकिंगहॅम मर्डर्स'ने उघडला 'मामी'चा पडदा, प्रियांका चोप्रासह इतर सेलिब्रिटीजचा रेड कार्पेटवर जलवा

By संजय घावरे | Published: October 28, 2023 11:27 PM

Mami Film Festival: मामी फिल्म फेस्टिव्हल २०२३ची मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली आहे. करीना कपूर अभिनीत आणि हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' या आगामी थ्रिलरपटाने यंदा मामीचा पडदा उघडला.

मुंबई - मामी फिल्म फेस्टिव्हल २०२३ची मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली आहे. करीना कपूर अभिनीत आणि हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' या आगामी थ्रिलरपटाने यंदा मामीचा पडदा उघडला. प्रियांका चोप्रासह इतर सेलिब्रिटीजचा जलवा रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. ५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ७० भाषांमधील २५० चित्रपट आणि लघुपट दाखवले जाणार आहेत. 

नीता मुकेश अंबानी संस्कृति केंद्रामध्ये आयोजित मामीच्या ओपनिंग सोहळ्यात फिल्म इंडस्ट्रीतील बऱ्याच दिग्गजांनी हजेरी लावली. या सर्वांमध्ये सध्या हॉलिवूडमध्ये धमाल करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राने लक्ष वेधून घेतले. मामीमध्ये सामील होण्यासाठी प्रियांका खास लंडनहून भारतात आली आहे. मामीच्या रेड कार्पेटवर करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, कमल हासन, विधु विनोद चोप्रा, शबाना आजमी, सोनम कपूर, अली फजल, ऋचा चड्ढा, करण जौहर, सान्या मल्होत्रा, भूमि पेडणेकर, राजकुमार राव, विजय वर्मा, सिद्धार्थ रॉय कपूर, रितेश देशमुख, सनी लियोनी, हंसल मेहता, अॅश टंडन, एकता कपूर, रणवीर ब्रार, प्रभलीन संधू  आदी सेलिब्रिटीजचा जलवा पाहायला मिळाला.

लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. आता मामी चित्रपट महोत्सव २०२३ च्या ओपनिंगचा मान या चित्रपटाने पटकावला आहे. या सिनेमाला उपस्थितीतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. करीनाने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. याचे लेखन असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव कक्कर यांनी केले आहे. हेरगिरीवर आधारलेल्या या चित्रपटात करीना मुख्य भूमिकेत आहे.

१० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. मुंबईत आठ ठिकाणी या चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे. मामीमध्ये यंदा अपर्णा सेनचा ‘द रेपिस्ट’, अनुराग कश्यप यांचा क्राइम थ्रिलर ‘कॅनेडी’, वरुण ग्रोव्हर दिग्दर्शित ‘ऑल इंडिया रँक’, ब्रॅडली कूपर यांचा आंतरराष्ट्रीय ‘मेस्ट्रो’ अशा काही महत्त्वपूर्ण सिनेमांचा समावेश आहे.

टॅग्स :सिनेमामुंबई