Join us  

Lata Mangeshkar: मराठी माणसांबद्दलच्या दिलीप कुमारांच्या विधानानं दुखावल्या होत्या लतादीदी; १३ वर्ष बोलणं टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 12:30 PM

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात निधन; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; संपूर्ण देशावर शोककळा

बई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये गाणी गायली. मात्र मातृभाषा मराठी असल्यानं तिच्यावर त्यांचं जास्त प्रेम. मराठी माणसांबद्दल एकदा दिलीप कुमार यांनी एक टिप्पणी केली होती. त्यामुळे लता मंगेशकर खूप दुखावल्या होत्या. त्यानंतर जवळपास १३ वर्षे त्या दिलीप कुमार यांच्याशी बोलत नाहीत. अखेर १३ वर्षांनंतर दोन्ही दिग्गज व्यक्तींमधला अबोला संपला आणि लता दीदींनी दिलीप कुमार यांना राखी बांधली.

कारकिर्दीच्या सुरुवातीला लता मंगेशकर लोकलनं प्रवास करायच्या. मुंबईतल्या मालाडमध्ये असलेल्या बॉम्बे स्टुडियोला त्या लोकलनं जायच्या. संगीतकार अनिल बिस्वास त्यावेळी लतादीदींसोबत असायचे. दिलीप कुमारदेखील त्यावेळी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. दिलीप कुमार आणि अनिल बिस्वास एकमेकांना ओळखायचे.

लोकल प्रवासात दिलीप कुमार आणि अनिल बिस्वास यांच्या गप्पा सुरू होत्या. आपल्याला लता यांचा आवाज फार आवडतो, असं बिस्वास त्यावेळी म्हणाले. लता मंगेशकर या महाराष्ट्राच्या असल्याचं त्यावेळी दिलीप कुमार यांना प्रथमच कळलं. 'महाराष्ट्रातील लोकांचं उर्दूवर फारसं प्रभुत्व नसतं. त्यांचं उर्दू म्हणजे डाळ भात,' अशा शब्दांत दिलीप यांनी खिल्ली उडवली होती.

दिलीप कुमार यांचे शब्द लता मंगेशकरांच्या मनाला लागले. त्यांनी उर्दूवर काम सुरू केलं. शब्दांचे अर्थ, त्यांचे उच्चार यावर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. लता दीदींनी उर्दूवर अतिशय उत्तम पकड मिळवली. त्यानंतर दिलीप कुमार यांनीच अनेकांना चित्रपटांच्या गाण्यांसाठी लता दीदींचं नाव सुचवलं. लता दीदी आणि दिलीप कुमार यांच्यात १९५७ पासून अबोला होता. १९७० मध्ये हा अबोला संपला.

टॅग्स :लता मंगेशकरदिलीप कुमार