Join us  

Oscar 2022मध्ये लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा झाला नाही उल्लेख, नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 2:06 PM

Oscar 2022: ऑस्कर २०२२ मध्ये दरवर्षीप्रमाणे, मेमोरियल सेक्शनमध्ये गेल्या वर्षभरात कलाविश्वातील गमावलेल्या अनेक चित्रपट व्यक्तिमत्त्वांना आणि अभिनेत्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. मात्र, ऑस्कर सोहळ्यात दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा उल्लेखही करण्यात आला नाही.

ऑस्कर २०२२ (Oscar 2022) मध्ये दरवर्षीप्रमाणे, मेमोरियल सेक्शनमध्ये गेल्या वर्षभरात कलाविश्वातील गमावलेल्या अनेक चित्रपट व्यक्तिमत्त्वांना आणि अभिनेत्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. सिडनी पॉटियर, इव्हान रीटमन आणि बेट्टी व्हाईट यांच्यासह काही दिग्गज नावांचा उल्लेख करण्यात आला.मात्र, ऑस्कर सोहळ्यात दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी भडकले आहेत. ते याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहेत. 

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गायिकेचा मृत्यू मल्टी ऑर्गन निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे उघड केले होते. मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले होते. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, तेलुगू आणि मराठीसह विविध भाषांमध्ये अनेक गाणी गायली. लताजींना भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, NTR राष्ट्रीय पुरस्कार आणि ANR राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दिलीप कुमार यांचे गेल्या वर्षी ७ जुलै रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नया दौर, राम और श्याम, सौदागर आदींसह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

 

ऑस्करमध्ये झालेली ही चूक चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही आणि ते सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, "ऑस्करमध्ये आजपर्यंत दाखविलेल्या एकूण चित्रपटांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या लता मंगेशकर यांचा पुरस्कार सोहळ्यात कुठेही उल्लेख केलेला नाही. ऑस्कर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या लायकीचा मानत नाही का?"

आणखी एका यूजरने लिहिले की, "लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्याची अपेक्षा मी करत होतो."

टॅग्स :लता मंगेशकरदिलीप कुमारऑस्कर