Join us  

‘अशी ही बनवाबनवी’फेम सिद्धार्थ रे आज नाही, पण त्याच्या दोन्ही पोरांनी नाव काढलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 5:43 PM

Ashi Hi Banwa Banwi , Siddharth Ray : सिद्धार्थ रे याने वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 8 मार्च 2004 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं होतं. या सिद्धार्थची दोन्ही मुलं आता कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banwa Banwi) हा सुपरहिट चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात आणखी एक चेहरा होता. तो म्हणजे, धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच शंतनू. शंतनूची ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ उर्फ सुशांत रे (Siddharth Ray) याने साकारली होती. दुदैवाने सिद्धार्थ रे याने वयाच्या 40 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. 8 मार्च 2004 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं.

सिद्धार्थचा सुशांत म्हणजेच सिद्धार्थ रे हा व्ही शांताराम यांचा नातू आहे. (व्ही शांताराम यांची मुलगी चारूशिला यांचा विवाह डॉ सुब्रतो रे यांच्याशी झाला होता.) व्ही शांताराम यांनीच आपल्या नातवाला म्हणजे सिध्दार्थला ‘चाणी’ चित्रपटात बालभूमीका साकारण्याची संधी दिली होती. पुढे मोठा झाल्यावर जैत रे जैत, बाळाचे बाप ब्रह्मचारी, अशी ही बनवा बनवी, वंश, बाजीगर, पिता, जानी दुश्मन, बिच्छु, परवाने अशा चित्रपटात तो झळकला. ‘चरस’ हा सिध्दार्थचा अखेरचा चित्रपट ठरला.

या सिद्धार्थची  दोन्ही मुलं आता कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची पत्नी आणि तेलगू अभिनेत्री शांतीप्रिया (Shantipriya) हिनं दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं. सिद्धार्थच्या मृत्यूवेळी त्याची दोन्ही मुलं  शुभम आणि शिष्या खूपच लहान होती.पण आता ती मोठी झाली आहेत.  

यापैकी मोठा मुलगा शुभम रे याला संगीत आणि मॉडेलिंग क्षेत्राची आवड आहे, तर धाकटा मुलगा शिष्याने दिग्दर्शनाचे धडे गिरवले आहेत. लेखक म्हणून तो आता हिंदी सृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करताना दिसत आहे. येत्या 1 फेब्रुवारीला डिज्नी हॉट स्टारवर रिलीज होऊ घातलेली कबीर खुराना दिग्दर्शित Dramayama ही शॉर्ट फिल्म रिलीज होत आहे. या फिल्मची पटकथा शिष्याने लिहिली आहे. यात रिनी सेन मुख्य नायिका तर ‘तारे जमीं पर’ या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातील बालकलाकार दर्शील सफारी या शॉर्टफिल्ममध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सिद्धार्थची पत्नी शांतीप्रिया ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अक्षय कुमारच्या ‘सौगंध’ या पहिल्या चित्रपटामध्ये शांतीप्रियाही त्याची नायिका होती. शांतीप्रिया ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे.1999 मध्ये सिद्धार्थ आणि शांतीप्रिया यांचं लग्न झालं होतं.  

टॅग्स :अशी ही बनवाबनवी