Join us  

कियारा अडवाणी सांगते, माझ्या आणि शाहिदमध्ये आहे हे साम्य, ऐकून सगळ्यांना बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 6:43 PM

कबीर सिंग या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

ठळक मुद्देया प्रवासात मला माझ्यासारखा एक व्यक्ती भेटला. आमच्या खाण्याच्या सवयी सारख्या आहेत. लोक पिझ्झा, बर्गर पाहून खूश होतात. पण आम्ही दोघे भेंडी, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांच्या प्रेमात आहोत. त्यामुळे आम्ही चित्रीकरणाच्या वेळी आवडीने हे सगळ्या गोष्टी खात असू..

कबीर सिंग या चित्रपटातील कियारा अडवाणीच्या लुकची सध्या चांगलीच चर्चा आहे. अतिशय कमी मेकअपमधील कियाराची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या चित्रपटाबाबत आणि कियाराच्या एकंदरीत कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...

कबीर सिंग या चित्रपटातील तुझा लुक, तुझी भूमिका खूपच वेगळी आहे. या भूमिकेविषयी काय सांगशील?कबीर सिंग हा अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा रिमेक आहे. मी हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यास मी उत्सुक होते. खरे तर मला या चित्रपटासाठी विचारल्यानंतर मीच का? असा प्रश्न मी चित्रपटाच्या टीमला विचारला होता. कारण ही नायिका अतिशय साधी असून तिच्यात एक गोडवा आहे. आमची भूमिकेबाबत चर्चा झाल्यानंतर या भूमिकेसाठी माझे ऑडिशन घेण्यात आले आणि या चित्रपटासाठी माझी निवड झाली. प्रीती खूप साधी मुलगी असून ती खूपच कमी मेकअप करते. ती शीख असल्याने हातात कडा घालते. तसेच अतिशय छोटे कानातले घालते. माझी आजी असे छोटेसे कानातले घालयची. त्यामुळे मला या व्यक्तिरेखेमुळे तिची सतत आठवण यायची. मला स्वतःला प्रेमकथा खूप आवडतात त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे.

या चित्रपटात शाहिद कपूर तुझ्यासोबत मुख्य भूमिकेत आहे, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?शाहिद खूप चांगला अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तो खऱ्या आयुष्यात खूप शांत असल्याने त्याच्यासोबत काम करताना दडपण यायचे नाही. आम्ही चित्रीकरणापूर्वी दृश्य वाचून त्यावर चर्चा करत असू... अभिनय करताना देवाणघेवाण होणे गरजेचे असते. तो स्टार असला तरी तो समोरच्याचे ऐकून घेतो, हा त्याचा खूप चांगला गुण आहे आणि विशेष म्हणजे या प्रवासात मला माझ्यासारखा एक व्यक्ती भेटला. आमच्या खाण्याच्या सवयी खूपच सारख्या आहेत. लोक पिझ्झा, बर्गर पाहून खूश होतात. पण आम्ही दोघे भेंडी, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांच्या प्रेमात आहोत. त्यामुळे आम्ही चित्रीकरणाच्या वेळी आवडीने हे सगळ्या गोष्टी खात असू...

तू अभिनयक्षेत्रात येऊन खूपच कमी कालावधी झाला असला तरी तू तुझी एक बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहेस, तू चित्रपट खूप चोखंदळपणे निवडतेस का?मी चित्रपटाची, वेबसिरिजची कथा ऐकल्यावरच मला कळते की, त्यात दम आहे की नाही... ती कथा ऐकल्यानंतर ती माझ्या मनाला स्पर्शून जाणे महत्त्वाचे असते. माझ्या मनाने काम करण्यासाठी होकार दिला तरच मी तो प्रोजेक्ट स्वीकारते.

तू चित्रपट आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम केले आहेस, या दोघांमध्ये तुला काय फरक जाणवतो?डिजिटल क्षेत्रात काम करताना तुम्हाला अधिक क्रिएटिव्ह पद्धतीने काम करायला मिळते. तिथे सेन्सॉरशिपचे देखील दडपण नसते. तसेच खूप चांगले दिग्दर्शक, निर्माते या क्षेत्राकडे वळत आहेत ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण आजकाल मोठ्या पडद्यावर देखील खूप चांगले विषय हाताळले जात आहेत याचा मला आनंद होत आहे. 

  

टॅग्स :कबीर सिंगकियारा अडवाणीशाहिद कपूर