Join us  

खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 10:24 AM

'खलनायक' सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास प्रिमिअर नाईट आयोजित करण्यात आली.

सुभाष घई (Subhash Ghai) यांचा सुपरहिट सिनेमा 'खलनायक' ला ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने 'खलनायक' मुक्ता सिनेमाच्या सर्व थिएटर्समध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला. मुंबईत प्रिमिअरही आयोजित करण्यात आला. प्रिमिअरला दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनीही हजेरी लावली. मात्र माधुरी दीक्षित यावेळी दिसली नाही. माध्यमांसोबत बातचीत करताना सुभाष घई यांनी माधुरी (Madhuri Dixit) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्याशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला. 

'खलनायक'च्या प्रिमियर नाईटला सुभाष घई यांना सिनेमा हिट होईल हे माहित होतं का असं विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले,'मला नेहमीच थोडा आत्मविश्वास होता. पण एक दिग्दर्शक म्हणून मला थोडी भीती वाटत होती. पण संजय दत्तला माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास होता. तो म्हणायचा हा सिनेमा खूप दिवस चालेल पण हे बोलताना बघायचा माधुरीकडेच.'

सुभाष घई यांचं हे वाक्य ऐकताच सगळेच हसायला लागले. संजय दत्तही यावेळी शॉक झाला. तो यावर काहीच बोलला नाही. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचं अफेअर बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेतलं होतं.दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. यामध्ये आयकॉनिक सिनेमा 'साजन' देखील आहे. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. 

या इव्हेंटला सुभाष घई यांनी सर्वांचे आभार मानले. सिनेमात काम करणाऱ्या सर्व टेक्निशियनचेही त्यांनी आभार मानले. म्युझिक कंपोजर लक्ष्मीकांत प्यारेलाल पासून गीतकार आनंद बक्क्षी यांनाही धन्यवाद दिले. तसंच दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांची आठवण काढली. त्यांनीच आयकॉनिक 'चोली के पिछे' गाणं कोरिओग्राफ केलं होतं.

टॅग्स :सुभाष घईसंजय दत्तमाधुरी दिक्षितबॉलिवूड