KGF chapter 2 : प्रसिद्ध साऊथ सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ (KGF) हा सिनेमा तुफान गाजला. आता याच सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘केजीएफ - चॅप्टर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आपला रॉकीभाई अर्थात यश या चित्रपटात आहेच. याशिवाय बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अर्थात संजय दत्त हा देखील या चित्रपटात अधीराच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन हिची सुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. ‘केजीएफ - चॅप्टर 2’ पाहायला तुम्हीही उत्सुक असाल. पण हा सिनेमा बघण्याआधी केजीएफ अर्थात कोलार गोल्ड फील्डची खरी कहाणी तुम्हाला माहित असायला हवी. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
केजीएफ याचा अर्थ कोलार गोल्ड फील्ड (Kolar Gold Fields). केजीएफ या चित्रपटात याच सोन्याच्या खाणीची पार्श्वभूमी दाखवली आहे. केजीएफ चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. पण कोलार गोल्ड फील्ड सत्यात आहेत. या रिअल केजीएफचा इतिहास वेगळाच आहे.
इंग्रज येण्यापूर्वी खाणीतून जेवढं सोनं काढण्यात आलं होतं ते अर्धविकसित होतं. लोकांचे छोटे छोटे समूह लोखंडाच्या औजारांनी आणि तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात जमीन खोदायचे अशात इंग्रज सेना अधिकारी जॉन वॉरन याची नजर या खाणींवर पडली. त्याला या खाणींचं महत्व समजलं.
जॉन वॉरनने या खाणींवर एक लेख लिहिला होता. 1799मध्ये श्रीगंगापट्टनममध्ये इंग्रजांच्या हातून टीपू सुलतान मारला गेल्यावर इंग्रजांनी टीपूचे भाग मौसरला सोपवण्याचा निर्णय झाला. पण त्यासाठी जमिनीचा सर्व्हे महत्वाचा होता. वॉरन तेव्हा सेनेच्या 33व्या बटालियनचा कमांडर होता. या कामासाठी त्याला कोलारला बोलवण्यात आलं. 1802 मध्ये म्हैसूरच्या सीमेचं काम सुरू झालं. त्याने खाणीत सुरू असलेलं काम पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की, 56किलो मातीतून फारच थोडं सोनं निघत होतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तरी, सोन्याचे काही कण तेवढेच हाती लागायचे. या कामात हाती काहीच लागलं नाही. उलट अनेक मजुरांचा जीव गेला.
अर्थात यानंतरही तब्बल सहा दशकं अनेक लोकांनी सोनं शोधण्यात आपली नशीब आजमावलं. अनेक शोध केले गेले. पण कुणालाही सोन्याचा मोठा खजिना मिळाला नाही. पण 1871 मध्ये जॉन वॉरनचा तो लेख ब्रिटीश सैनिक मायकेल फिट्जगॅराल्ड लॅवले याने वाचला आणि सोनं मिळवण्याच्या एकाच ध्यासानं त्याला पछाडलं. त्याने बंगळुरू छावणीलाच आपलं घर बनवलं. त्याचा खाणींमधील इंटरेस्ट वाढला.
आपल्या अनुभवाच्या मदतीने लॅवलेने खोदकामासाठी काही जागा निवडल्या. दोन वर्षांपेक्षा जास्त शोध केल्यानंतर 1853 मध्ये महाराजाच्या सरकारकडून त्याने खोदकामासाठी परवानगी घेतली. त्याला 20 वर्षांसाठी एक भाग मिळाला आणि त्याने इथे आधुनिक पद्धतीने खोदकाम सुरू केलं.पण लवकरच लॅवलेकडे असलेले पैसे संपले आणि 1880 मध्ये लंडनच्या मायनिंग फर्म टॅलर अॅन्ड सन्सने कोलार खाण हाती घेतली. त्यांनी इतिहास बदलून टाकला. तो आपल्यासोबत कोलारमध्ये आधुनिक मशीन घेऊन आला आणि खोदकाम सुरू केलं. एकेकाळी कोलारची खाण सर्वात खोल आणि सर्वात जास्त सोनं देणारी खाण होती. कोलार गोल्ड माइन्स हे भारतातील अशा पहिल्या शहरांपैकी होतं जिथे वीज आली होती.
1900 मध्ये म्हैसूरच्या महाराजांना कावेरी नदीवर पानचक्की लावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर इथे वीज वीज पोहोचू लागली. या कामासाठी ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीहून मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. या मशीन हत्ती आणि घोडे खेचत होते. त्यावेळी बंगळुरू आणि म्हैसूरमध्येही वीज पोहोचली नव्हती. वीज आल्यामुळे खाणीत लिफ्ट सुरू झाल्या.
खोदकाम जोरात सुरू झालं आणि संपत्ती येऊ लागली होती. अशाप्रकारे पडीत जमीन असलेला कोलार शहर 1930 पर्यंत एक समृद्ध शहर बनलं. पण एकीकेड इंग्रज शाही जीवन जगत होते तर खाणीत काम करणारे भारतीय मजूरांची स्थिती फारच बेकार होती. इंग्रज बंगल्यात रहायचे तर भारतीय मजूर मातीच्या खोल्यांमध्ये. इथे उंदरांचा सुळसुळाटही होता. शक्य तेवढं सोनं काढल्याने कोलार गोल्ड माइन्सची नियती बदलली. यूरोपहून आलेले खनन तज्ज्ञ घाना पश्चिम आफ्रिकेत खोदकामासाठी गेले आणि कोलार गोल्ड फील्ड्स 2001 मध्ये बंद पडली. या खाणीत आज पाणी भरलं आहे. आता ही खाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.