Join us  

याचंही कौतुक व्हायला हवं...! ‘KGF 2’च्या 'रॉकी'ला झोपडपट्टीतल्या या पठ्ठ्यानं दिलायं आवाज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 5:03 PM

KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’आधी त्याचं नावही कोणाला माहित नव्हतं. पण आज तो स्टार झाला आहे. अर्थात यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. हे त्याच्या 14 वर्षांच्या कष्टाचं फळ आहे.

 KGF Chapter 2 Dubbing Artist :  हिंदीत डब झालेल्या ‘पुष्पा’ या सुपरडुपर हिट सिनेमाला   मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे  यानं आवाज दिला होता,  त्याचा आवाज अल्लू अर्जुनच्या पात्रालर इतका फिट बसला की, अनेकांनी श्रेयसचं भरभरून कौतुक केलं होतं. आता असंच कौतुक होतंय ते ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनला आवाज देणाऱ्या मुंबईतल्या  एका छोकऱ्याचं. होय, हिंदीत ‘केजीएफ 2’च्या ( KGF Chapter 2)रॉकीभाईला अर्थात अभिनेता यशला (Yash) आवाज दिला आहे तो सचिन गोळे नावाच्या मुंबईच्या एका तरूणानं. ‘केजीएफ 2’आधी कदाचित सचिन गोळे (Sachin Gole) हे नाव कोणालाही माहित नव्हतं. पण आज सचिन स्टार झाला आहे. अर्थात यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. हे त्याच्या 14 वर्षांच्या कष्टाचं फळ आहे.‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत सचिन गोळे त्याच्या डबिंग क्षेत्रातील स्ट्रगलबद्दल बोलला.

 झोपडपट्टीतील  छोटासा स्टुडिओ ते स्टारडम...  मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर 2 या झोपडपट्टीतील एका छोट्याशा स्टुडिओत सचिन काम करतो. हा स्टुडिओ सुद्धा त्याचा नाही तर त्याच्या एका मित्राचा आहे. 2008 मध्ये सचिन इंडस्ट्रीत आला. खरं तर त्याला हिरो बनायचं होतं. याच स्वप्नाचा पाठलाग करत तो मुंबईत दाखल झाला. पण 2010मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि यानंतर अ‍ॅक्टिंगमध्ये सपशेल फेल होण्याचा ‘आघात’ त्याला सोसावा लागला. अशात एका मित्राने सचिनला डबिंग करण्याचा सल्ला दिला.  गणेश दिवेकर नावाचे एक खूप मोठे डबिंग आर्टिस्ट आहेत त्यांनी सचिनला मदत केली. या काळात सचिननं अनेक बँकांमध्येही काम केलं. कामावर हजेरी लावून तो साऊंड स्टुडिओत  येऊन बसायचा. मात्र, एक दिवस त्याची ही चोरी पकडली गेली आणि त्याची  कानउघडणी झाली. यानंतर सचिनने अनेक स्टुडिओंचे उंबरठे झिजवले. अनेकांची हेटाळणी सहन केली. प्रसंगी अपमान गिळला. पण तो आपल्या ध्येयावर ठाम राहिला. टिळक नगर आणि अंधेरीमध्ये काही साऊथ इंडियन चित्रपट डब करण्याचे स्टुडिओ होते. सचिनने तिथे  नशीब आजमावून पाहिलं आणि इथे सचिनला संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं केलं.  साऊथ स्टार धनुषच्या ‘मेरी ताकत मेरा फैसला’ या चित्रपटापासून सचिनला मोठा ब्रेक मिळाला. मग हळूहळू त्यानी धनुषच्या अनेक चित्रपटांसाठी डबिंग केलं.  सचिनचं कौतुक होऊ लागलं.  

असा मिळाला केजीएफ 1 अ‍ॅण्ड 2सुपरस्टार यशच्या अनेक चित्रपटांना सचिनने आवाज दिला आहे. केजीएफ पूर्वीच्या यशच्या अनेक चित्रपटांसाठी डबिंग केलं होतं. पण ही गोष्ट यशला माहिती नव्हती. ‘केजीएफ चॅप्टर 1’ हिंदीत डब करायचा म्हटल्यावर, यशने त्याचे आधीचे हिंदी डब सिनेमे पाहायचा सपाटा लावला.  त्यावेळी सचिनच्या आवाजानं यशचं लक्ष वेधून घेतलं आणि सचिनची ‘केजीएफ- चॅप्टर 1’साठी निवड झाली. केजीएफच्या ऑडिशनमध्ये  सचिनला, ‘ट्रिगर पे हाथ रखने वाला शूटर नहीं होता. लड़की पे हाथ डालने वाला मर्द नहीं होता और अप्पुन की औकात अप्पुन के चाहनेवालों से ज्यादा और कोई समझ नहीं सकता,’ हा डायलॉग देण्यात आला होता. हाच डायलॉग चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रचंड हिट ठरला. यानंतर सचिनचं नशीब पालटलं. आता ‘केजीएफ 2’ला सुद्धा त्यानेच आवाज दिलाये. सचिनच्याच शब्दांत सांगायचं तर, केजीएफमुळे त्याच्या आवाजाला जणू शरीर मिळालं.  हे त्याच्या 14 वर्षांच्या कष्टाचं फळ आहे.  

टॅग्स :केजीएफयशTollywood