करण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 10:29 IST
'हम है हॅप्पी' नावाचा तृतीयपंथीयांचा बँड करणने पहिल्यांदा लॉन्च केला. आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी करणने हा पहिला बँड लॉन्च केला होता.
करण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती
बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने मुंबईत एका बँडचे लॉन्चिंग केलं. या बँडचे नाव ६ पॅक बँड २.० असे ठेवण्यात आले आहे.या बँडची खासियत म्हणजे हा बँड वेगवेगळ्या प्रकारच्या सहा दिव्यांग मुलांचा आहे. यांत १३ ते १८ वर्षे वयोगटातील तीन मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. ही मुलं स्पेशल आणि दिव्यांग असली तरी त्यांच्या जगण्याचा आनंद तसूभरही कमी नाही. त्यांचं संगीतावरील प्रेम, सळसळता उत्साह, पॅशन कुणालाही थक्क करेल असाच आहे. या सहा जणांची ऊर्जा आणि उत्साह तसंच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन करण जोहरला भावला. शिवाय एप्रिल महिना ऑटिजम जनजागृती महिना पाळला जातो. त्यामुळेच या बँडच्या माध्यमातून ऑटिजमबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण जोहरने हा बँड लॉन्च केला आहे. या सहाजणांमध्ये असलेलं कौशल्य आणि ऊर्जा पाहून आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया करणने बँड लॉन्चिंगच्या वेळी केली. या बँडशी आपलं नाव जोडलं जाणं ही भाग्याची गोष्ट समजतो असंही करणने म्हटले आहे. यशराज फिल्म्सचे प्रमुख आशीष पटेल यांनी या बँडची निर्मिती केली आहे. याशिवाय शमीर टंडन यांनी या बँडसाठी संगीत दिलं आहे. 'माय नेम इज खान' या सिनेमात करणने ऑटिजम पीडित व्यक्तीची कथा मांडली होती. त्यामुळे हा विषय करणसाठी अगदी जिव्हाळ्याचा आणि जवळचा आहे. त्यामुळेच या बँडच्या माध्यमातून ऑटिजम जनजागृती आणि या आजाराने त्रस्त व्यक्तींमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्दशाने करणने या बँडला लॉन्च केले आहे. याआधीही २०१६ साली करणने पहिल्यांदा हटके प्रकारचा बँड लॉन्च करुन सा-यांचं लक्ष वेधलं. 'हम है हॅप्पी' नावाचा तृतीयपंथीयांचा बँड करणने पहिल्यांदा लॉन्च केला. आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी करणने हा पहिला बँड लॉन्च केला होता.