Join us  

मुंबईतील हा प्रसिद्ध उद्योग समूह करणार आर. के. स्टुडिओची खरेदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:55 PM

बॉलिवूड आणि आर. के. स्टुडिओ यांचे नाते खूपच जवळचे होते. हा स्टुडिओ आता विकला जाणार असून यासाठी मुंबईतील एका मोठ्या उद्योजक समूहासोबत कपूर कुटंबियांची चर्चा सुरू असल्याचे कळतेय.

कपूर घराण्याचा ठेवा असलेला ऐतिहासिक आर. के. स्टुडिओ लवकरच विकला जाणार आहे. राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी या स्टुडिओची स्थापना केली होती. मात्र, लवकरच हा स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे. बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या या स्टुडिओने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूड आणि आर. के. स्टुडिओ यांचे नाते खूपच जवळचे होते. हा स्टुडिओ आता विकला जाणार असून यासाठी मुंबईतील एका मोठ्या उद्योजक समूहासोबत कपूर कुटंबियांची चर्चा सुरू असल्याचे कळतेय.

पिंकव्हिला या बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार कपूर कुंटुबीय आणि गोदरेज प्रापर्टीज यांच्यात सध्या आर. के. स्टुडिओच्या विक्रीवरून चर्चा सुरू असून गोदरेज हा स्टुडिओ विकत घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच स्टुडिओच्या जवळ असलेली सव्वा दोन एकर जागाही गोदरेजने १७५ कोटी रुपयांना विकत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. आर. के. स्टुडिओ हा खूप जूना असला तरी याद्वारे मिळणारे उत्पन्न हे खूपच कमी असल्याने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांतील घेतला होता. हा निर्णय घेतला त्यावेळी राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर या देखील हयात होत्या आणि त्यांनी देखील या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला होता. राज कपूर यांची मुले रणधीर, ऋषी, राजीव, रितू नंदा आणि रिमा जैन यांनी सहमताने हा स्टुडिओ विकण्याचे ठरवले होते. आर के स्टुडिओचे मालकी हक्क राज कपूर यांची मुले ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे आहेत. हा स्टुडिओ विकल्यानंतर मिळणारे पैसे रणधीर, ऋषी, राजीव, रितू नंदा आणि रिमा जैन या भावडांमध्ये वाटले जाणार आहेत. 

आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत होता. पण यावर्षींचा गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव  होता. त्यामुळे यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीर कपूरसकट सगळ्यांनाच आपल्या भावना रोखणे अशक्य झाले होते. 

टॅग्स :आर के स्टुडिओऋषी कपूररणधीर कपूर