Join us  

कनिका कपूरमुळे तिच्या बिल्डिंमधील लोकांना सहन करावा लागतोय मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:39 PM

कनिका कपूरमुळे तिच्या बिल्डिंगमधील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देकनिका राहात असलेल्या कल्पना टॉवरमधील आतापर्यंत ३५ रहिवाशांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आाहे आणि त्यातील ११ जणांची चाचणी निगेटिव्ह आलेली असून इतरांचे रिपॉर्ट लवकरच येणार आहेत.

कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले होते. तिच्यामुळे आता तिच्या बिल्डिंगमधील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ती राहात असलेल्या कल्पना टॉवरमधील आतापर्यंत ३५ रहिवाशांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आाहे आणि त्यातील ११ जणांची चाचणी निगेटिव्ह आलेली असून इतरांचे रिपॉर्ट लवकरच येणार आहेत.

कनिका कपूर तिच्या काकासोबत काही दिवस या टॉवरमध्ये राहात असल्याने या टॉवरमध्ये राहाणाऱ्या लोकांची चाचणी करण्यात आली आहे. कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.

तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते की, मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.

कनिका कपूरचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट कनिकाचेच आहेत का असा प्रश्न तिच्या घरातल्यांना पडला होता. कारण या रिपोर्टमध्ये मुलगीऐवजी मुलगा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिची कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली. या चाचणीत देखील तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :कनिका कपूर