Join us  

कंगना राणौत म्हणते, रडू नका, माझ्यासारखे बना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 6:00 PM

‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ च्या रिलीजनंतर क्रिश यांनीही कंगनाविरोधात मोर्चा उघडला.आता कंगनाने या सगळ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देमाझ्यावर आरोप करून वा माझा हेवा करून काय होणार. मी १० वर्षे संघर्ष केला आहे. तुम्हीही करा , असेही ती म्हणाली.

कंगना राणौत सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लीड रोल साकारण्यासोबत कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. आधी कृष हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. पण अचानक कृष यांनी हा चित्रपट सोडला आणि कंगनाने दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. यानंतर कंगनावर अनेक आरोप झालेत. चित्रपटाच्या रिलीजनंतर क्रिश यांनीही कंगनाविरोधात मोर्चा उघडला.आता कंगनाने या सगळ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.

होय, एका युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिच्यावर आरोप करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ‘मणिकर्णिका’ रिलीज झालाय. कळत-नकळत तो मी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या अखेरचे सगळे निर्णय मी घेतले. आता मी केवळ इतकेच सांगू इच्छिते की, चित्रपट बनून रिलीज झालाय आणि त्यामुळे आता काहीही होऊ शकत नाही. रिलीजनंतर अनेकजण माझा हा रोल कापला, माझे नाव चुकीचे दिले, माझा आवाज गाळला, असे आरोप करत आहेत. या सगळ्यांना मी एकच सांगेल की, आता रडण्यात काहीही अर्थ नाही. आज मी जे काही आहे, ते स्वबळावर आहे. मी जे काही मिळवलेय, त्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. मी सुद्धा पाच मिनिटांच्या रोलने सुरुवात केली. अनेक चित्रपटात माझे सीन्स कापले गेलेत. ऐनवेळी मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. पण माझ्यात धमक होती आणि मी टिकले. एक दिग्दर्शक म्हणून कुणाला किती स्पेस द्यायची, हे मी ठरवणार होते आणि तेच मी केले. त्यामुळे रडत बसू नका. कष्ट करा, लायक बना, असे कंगना म्हणाली.

कंगना इथेच थांबली नाही तर तिने दिग्दर्शक क्रिश यांनाही डिवचले. मी क्रिश यांना एकच म्हणेल की, माझ्यावर आरोप करणा-यांना एकत्र घेऊन एक चित्रपट काढा, हवे तर अपूर्वकडून (कंगनावर क्रेडिट चोरल्याचा आरोप करणारा लेखक अपूर्व असरानी) कथा लिहून घ्या आणि मला चांगला धडा शिकवा. माझ्यावर आरोप करून वा माझा हेवा करून काय होणार. मी १० वर्षे संघर्ष केला आहे. तुम्हीही करा , असेही ती म्हणाली.

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी