Join us  

गुगलवर ‘कबीर सिंग’ हिट; 2019 मध्ये सर्वाधिक सर्च केला गेला शाहिदचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 1:52 PM

नित्यनेमाप्रमाणे यंदाही टॉप टेन ट्रेण्ड सर्चची यादी गुगलने जाहिर केली आहे.

ठळक मुद्दे ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा या गुगलच्या सर्च यादीत दहाव्या स्थानी राहिला.

जगातील कुठलीही माहिती हवी असो, गुगल आहेच. होय, गुगलवर सर्च केले की, एका क्लिकमध्ये माहिती तयार. जगभरातील कोट्यवधी लोक गुगलचा वापर करतात आणि वर्षाअखेर लोकांनी सर्वाधिक वेळा काय सर्च केले, कोणत्या व्यक्तिंना सर्वाधिक सर्च केले, याची माहिती गुगल प्रसिद्ध करते. नित्यनेमाप्रमाणे यंदाही टॉप टेन ट्रेण्ड सर्चची यादी गुगलने जाहिर केली आहे. होय,  सिनेमाची गोष्ट कराल, तर शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा सिनेमा भारतात यंदा गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेला.

‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला ‘कबीर सिंग’ हा सिनेमा यंदाचा सर्वात मोठा हिट ठरला. शाहिदने या चित्रपटात रंगवलेला ‘सनकी डॉक्टर’ सर्वांच्याच पसंतीत उतरला. अर्थात हा चित्रपट महिला विरोधी असल्याची टीकाही झाली. पण या टीकेमुळे हानी होण्याऐवजी चित्रपटाला फायदाच अधिक झाला. हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरला.

2019 मध्ये सर्वाधिक सर्च झालेला दुसरा सिनेमा ठरला तो ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’. थॉर, आर्यनमॅन, हल्क यासारख्या सुपरहिरोंनी सजलेल्या या हॉलिवूडपटालाही प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले. भारतातही या चित्रपटाने 373.22 कोटींची कमाई केली.

जोकिन फिनिक्स स्टारर ‘जोकर’ हा गुगलच्या टॉप टेन सर्चमध्ये तिस-या क्रमांकावर राहिला. तर ‘कॅप्टन मार्वेल’ हा हॉलिवूड सिनेमा चौथ्या स्थानी राहिला.पाचव्या स्थानी ‘सुपर 30’, सहाव्या स्थानी ‘मिशन मंगल’, सातव्या स्थानी ‘गली बॉय’, आठव्या स्थानी ‘वॉर’, नवव्या स्थानी ‘हाऊसफुल 4’ तर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा या गुगलच्या सर्च यादीत दहाव्या स्थानी राहिला.

टॅग्स :कबीर सिंगगुगलबेस्ट ऑफ 2019फ्लॅशबॅक