Join us  

कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 1:30 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला. अखेर ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूरला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले.

ठळक मुद्देकंगना नुकतीच  पत्रकार परिषदेत एका पत्रकारावर भडकली होती आणि तिने त्यावेळी या पत्रकाराला अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला. पाठोपाठ तिची बहीण रंगाली ही सुद्धा मीडियावर तुटून पडली. हे प्रकरण कंगनाला इतके महाग पडले की, एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्डने  ‘जजमेंटल है क्या’ या तिच्या आगामी चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्याने या प्रकरणाची निंदा करून ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही केली. अखेर ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूरला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले.एकताच्या बालाजी टेलिफिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसने एक स्टेटमेंट जारी करत या संपूर्ण प्रकरणावर खेद व्यक्त केला. ‘7 जुलै 2019 रोजी चित्रपटाच्या सॉन्ग लॉन्च इव्हेंटमध्ये ‘जजमेंटल है क्या’ची अभिनेत्री आणि पत्रकारात जे काही झाले, त्याबद्दल बरेच काही बोलले जात आहे. जे काही झाले ते कंगना आणि त्या पत्रकारातील वाद होता. त्यांचे स्वत:चे विचार होते. पण मी निर्माती या नात्याने या संपूर्ण वादावर माफी मागते. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हाला खेद आहे. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट येत्या 26 जुलैला प्रदर्शित होतोय.   या एका प्रकरणामुळे संपूर्ण टीमचे कष्ट वाया जाऊ नयेत, अशी आम्ही मीडियाला विनंती करतो,’ असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

सॉन्ग इव्हेंटमध्ये कंगना व पत्रकारात वाद झाला त्यावेळी एकता कपूर आणि अभिनेता राजकुमार राव हजर होते. वातावरण तापताच एकता आणि राजकुमार दोघांनीही मध्यस्थी करून माफीही मागितली होती. पण याऊपर या संपूर्ण वादावर  गिल्डने एकताला  पत्र लिहित तिने व कंगनाने याप्रकरणाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. 

कंगना नुकतीच  पत्रकार परिषदेत एका पत्रकारावर भडकली होती आणि तिने त्यावेळी या पत्रकाराला अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या. हे सर्व एवढ्यावरच थांबले नाही तर सोशल मीडियावर तिच्या बहीणीने मीडियाबद्दल अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या होत्या.

टॅग्स :कंगना राणौतएकता कपूर