Join us  

शेखर कपूरवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले, जा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 1:52 PM

देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक उपरोधिक ट्विट केले आहे.

ठळक मुद्देतुम्ही स्वत:ला भारतीय नाही तर निर्वासित समजता का? तुम्हाला कुठे निर्वासितासारखे वाटणार नाही,पाकिस्तानात ?  हा मेलोड्रामा बंद करा,’ असेही त्यांनी सुनावले.

देशातील झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) वाढत्या घटना पाहून विविध क्षेत्रातील 49 दिग्गजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. पण दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक उपरोधिक ट्विट करून या पत्रातील हवाच काढून घेतली. त्यांचे हे ट्विट पाहून जावेद अख्तर जाम भडकले. त्यांनी शेखर कपूर यांच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला. इतकेच नाही तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्लाही दिला.

शेखर कपूर यांनी शनिवारी मॉब लिंचिंगच्या घटना आणि यावर विचारवंतांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र या पार्श्वभूमीवर एक ट्विट केले. ‘फाळणी झाल्यावर आम्ही निर्वासिताप्रमाणे जगण्यास सुरुवात केली होती.  या काळात पालकांनी मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी पूर्णत: प्रयत्न केलेत. मी स्वत: बुद्धिजीवींपासून नेहमी दूर राहिलो. त्यांची मला नाहक भीती वाटते. त्यांनी मला नेहमीच तुच्छ असल्याचे भासवले. अर्थात नंतर अचानक माझ्या चित्रपटांमुळे मला जवळ केले. पण मला मात्र अद्यापही या बुद्धिजीवींची भीती वाटते. मी अजुनही एक निर्वासित आहे,’ असे शेखर कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले. शेखर कपूरच्या या ट्विटनंतर जावेद अख्तर यांच्या संतापाचा भडका उडाला.

‘तुम्हाला जवळ करणारे विचारवंत कोण? श्याम बेनेगल, अदूर गोपाल कृष्णा की रामचंद्र गुहा? खरचं? शेखर साहेब तुमची प्रकृती ठिक दिसत नाहीये. माझ्यामते तुम्ही एखादा मानसोपचार तज्ज्ञाकडे जावे. त्यात कसलीही लाज नाही,’ अशा शब्दांत त्यांनी शेखर कपूर यांना सुनावले. ते इथेच थांबले नाही तर पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘तुम्ही अजुनही निर्वासित आहात, असा तुमचा अर्थ आहे का? तुम्ही स्वत:ला भारतीय नाही तर निर्वासित समजता का? तुम्हाला कुठे निर्वासितासारखे वाटणार नाही,पाकिस्तानात ?  हा मेलोड्रामा बंद करा,’ असेही त्यांनी सुनावले.

टॅग्स :जावेद अख्तरशेखर कपूर