Join us  

'बॉलिवूडमध्ये तग धरुन राहणे कठीण', सुशांतच्या जुन्या मेसेजमधून झाले काही खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 1:38 PM

सुशांतचे काही मेसेज आणि कलाकार मित्रांशी साधलेल्या संवादातून काही धक्कादायक खुलासे होत आहेत.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर अख्ख्या देशाला हादरवून सोडले. सोशल मीडियावर प्रत्येकजण सुशांतच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहे. सोबत संतापही आहे. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार आहे. बॉलिवूडच्या काही लोकांनी सुशांतचे करिअर पद्धतशीरपणे संपवले, असा आरोप होत आहे. त्यातच आता काही मेसेज आणि कलाकार मित्रांशी सुशांतने साधलेल्या संवाद पाहून इंडस्ट्रीचे खरे रुप समोर येत आहे.

डान्सर व अभिनेत्री लॉरेन गॉटलिबने सोशल मीडियावर सुशांतसोबतच झालेल्या या संभाषणाचे स्क्रिनशॉट पोस्ट करत लिहिले की, आज अखेर सुशांतसोबत इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या बोलण्यावर लक्ष केंद्रीत केले, मेसेज पाहून मला त्या संवादातून एक गोष्ट समजली ती वाचून माझे मन हेलावून गेले. त्या बातचीतमध्ये एकमेकांच्या स्वप्नांसाठी इतके प्रेम, सपोर्ट आणि विनम्रता होती. माझे सुशांतसोबत एक कनेक्शन वाटत होते कारण आम्ही दोघेही इंडस्ट्री बाहेरचे होतो. टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडून बॉलिवूडमध्ये वळणं कठीण होतं. पण, मी माझ्या (चित्रपटांच्या) निवडीमुळे, निर्णयक्षमतेमुळे तग धरु शकलो असे सुशांत म्हणाला होता. 

बॉलिवूडमध्ये कोणाचाही गॉडफादर नसताना तग कसा धरता येत आहे, या मुद्द्यावर या दोघांची त्यावेळी चर्चा झाल्याचे मेसेज वाचून लक्षात येत आहे. दरम्यान, २०१९ मध्ये 'छिछोरे' या चित्रपटानंतर सुशांतकडे बऱ्याच बड्या निर्माते- दिग्दर्शकांनी पाठ फिरवल्याची धक्कादायक माहितीही या चर्चांमध्ये समोर येत आहे. 

लॉरेनने चॅट शेअर करत हेही म्हटले की, मला हा मेसेज शेअर करायचा होता कारण सर्वांना आठवण करून द्यायची होती की सर्वांना याच प्रेमाने व पाठींब्याने ट्रीट करायचे आहे जसे सुशांत करत होता. मला आजूबाजूला खूप निगेटिव्हिटी व द्वेष पाहत आहे. मला तुम्हाला हे नाही सांगायचं की, शोक कसा व्यक्त करा. कारण या आठवड्यात माझीही हालत खूप खराब झाली आहे. पण मला वाटते की सुशांतच्या विरासतचा सन्मान करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत