आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्डा यांची अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबतची प्रेमकहाणी ही खूप रंजक आहे. दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमामधून राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रेमकहाणीबाबत आणखी काही गमतीदार गोष्टी प्रेक्षकांना समजणार आहे. या कार्यक्रमामध्ये कपिल शर्मा याने राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत केलेल्या गमतीदार गप्पांमुळे प्रेक्षकांनाही हसू अनावर झालं.
यावेळी कपिल शर्मा याने खासदार राघव चड्डा यांना विचारलेला एक प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. कपिल शर्मा याने राघव चड्डा यांना विचारले की, निवडणूक जिंकणं कठीण असतं की पत्नीचं मन जिंकणं कठीण असतं? त्यावर उत्तर देताना राघव चड्डा म्हणाले की, निवडणुका तर दर पाच वर्षांनी येतात. मात्र पत्नीचं मन मात्र दर पाच मिनिटांनी जिंकावं लागतं. राघव चड्डा यांनी दिलेलं हे उत्तर ऐकून परिणीती चोप्रा हिलाही हसू आवरता आलं नाही.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख युवा नेते असलेल्या राघव चड्डा यांची प्रेमकहाणी राजकीय वर्तुळात आणि सिने जगतात चर्चेचा विषय ठरली होती. अखेरीस २४ सप्टेंबर २०२३ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे दोघेही लग्नबंधनात अडकले होते.