Join us  

'इंडियन आयडॉल' फेम नितीन कुमारच्या वडिलांचं अपघाती निधन, शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 11:53 AM

वडिलांसोबतचा एकमेव फोटो त्याने शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

'इंडियन आयडॉल 10' (Indian Idol 10) फेम गायक नितीन कुमारवर (Nitin Kumar) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील राजेंद्र यांचं अपघाती निधन झालं आहे. रस्ता क्रॉस करताना एका कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचे प्राण गेले होते. वडिलांच्या मृत्यूने नितीन कुमारला साहजिकच मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेशच्या ऊना पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

घटना घडली त्या ठिकाणी जवळच ढाब्यावर काम करणाऱ्या इरफान खानने पोलिसांना माहिती दिली की, 5 नोव्हेंबर रोजी राजेंद्र यांनी कार पार्क केली. ते सामान घेण्यासाठी ढाब्यावर आले. नंतर ते जसे त्यांच्या कारच्या दिशेने जात होते तेवढ्यात मागून वेगवान येणाऱ्या एका पिकअप वाहनाने राजेंद्र यांना धडक दिली. जीपच्या धडकेत राजेंद्र रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि कारचालक फरार झाला. 

इरफान खानने पुढे सांगितले की, आरोपी वेगाने सैलच्या दिशेने गेला. मी लगेच तिकडे फोन केला आणि राजेंद्र यांना रुग्णालयात नेले. आरोपी प्रचंड वेगाने अतिशय बेजबाबदारपणे जीप चालवत होता त्यामुळेच ही दुर्घटना घडली. '

नितीन कुमारने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो,'आयुष्यात फक्त एकदाच तुमच्यासोबत फोटो काढला. वाटलं नव्हतं तुम्ही मला इतक्या लवकर सोजून जाल. मी आज जो कोणी आहे तो मी नाही तर तुम्हीच आहात. तुम्ही सोडून गेला असला तरी आजही माझ्याजवळ आहात आणि कायम असाल. बाबा, तुमच्या आत्म्याला शांती मिळो. माझ्याकडे आज शब्द नाहीयेत.'

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी कलम 279,337 आणि मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 च्या कलम 187 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉलपरिवारमृत्यू