IIFA 2017 : Exclusive : टाईम्स स्क्वेअरवर रंगली आयफाची ‘वेलकम पार्टी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 12:55 IST
१८ वा आयफा वीकेंड अॅण्ड अवार्ड्सची सुरुवात झाली आहे. न्यूयॉर्कचा जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर सध्या ‘आयफा’मय झाला आहे.
IIFA 2017 : Exclusive : टाईम्स स्क्वेअरवर रंगली आयफाची ‘वेलकम पार्टी’!
१८ वा आयफा वीकेंड अॅण्ड अवार्ड्सची सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटी कालच न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत आणि त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमधील बॉलिवूडप्रेमींचा उत्साहही शिगेला पोहोचलायं. न्यूयॉर्कचा जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर सध्या ‘आयफा’मय झाला आहे. म्युझिक, डान्स, फॅशन अशा माहौलमध्ये होस्ट सिद्धार्थ कन्नन न्यूयाूर्कवासी आणि पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. कालपासून सुरु झालेल्या आयफा वीकेंडच्या पहिल्यादिवशी टाईम्स स्क्वेअरमध्ये ‘IIFA Stomp’चा रंगारंग कार्यक्रम रंगला. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असल्याने जणू टाईम्स स्क्वेअर बॉलिवूडमय झाला होता. बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याचे नृत्य सुरु झाले आणि अख्खा टाईम्स स्क्वेअर जणू नाचायला लागला. बॉलिवूडच्या गाण्यांवर वरूणने डान्सचा असा काही तडका लावला की, सगळीकडे एकच उत्साह संचारला. यानंतर रंगला तो फॅशन शो. बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा आणि तापसी पन्नू या दोघी ‘show-stoppers’ बनून रॅम्पवर उतरल्या तेव्हा बॉलिवूडप्रेमींनी एकच गलका केला. तिच्या पाठोपाठ शिल्पा शेट्टी, नेहा धूपिया, दिशा पटणी या फॅशन-शोमध्ये रॅम्पवॉक करताना दिसल्या. न्यूयॉर्कमध्ये प्रथमच आयफा अवार्डचे आयोजन होत आहे. न्यूयॉर्क शहर कधीही झोपत नाही,असे म्हटले जाते. अशा शहरात आयफाच्या निमित्ताने बॉलिवूड प्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. यंदा सैफ अली खान आणि करण जोहर हे दोघे आयफा अवार्ड सोहळा होस्ट करणार आहेत. सलमान खान, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत, दीया मिर्झा, प्रिती झिंटा, वरूण धवन, अनुष्का शर्मा असे सगळे सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.