Join us  

असा मिळाला पूजा सावंतच्या पहिल्या बॉलिवूडपटाला बाप्पाचा आशीर्वाद

By तेजल गावडे | Published: March 27, 2019 5:00 PM

'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

 

'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात तिने महिला माहूतची भूमिका साकारली आहे. या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

- तेजल गावडे.

'जंगली'मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली? बरेच वर्ष मी बॉलिवूडमध्ये ऑडिशन दिली होती. कधी कधी ते क्रॅक होत नव्हते तर कधी मला स्क्रीप्ट आवडत नव्हती. जंगलीसाठी मी ऑडिशन दिले, दुसऱ्या दिवशी फोन आला आणि तिसऱ्या दिवशी माझी निवड झाली होती.

'जंगली' चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल सांग? या चित्रपटात मी शंकराची भूमिका बजावली आहे जी महिला माहूत आहे. केरळमध्ये पहिली महिला माहूत आहे. तिचे स्वतःचे हत्ती आहेत. ती वीस बावीस वर्षांची मुलगी आहे. मला निसर्गाविषयी आत्मियता आहे आणि खासगी आयुष्यातही मी प्राण्यांचे रेस्क्यू करते. मला प्राण्यांची खूप आवड आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका करणे खूप सोपे होते. माझ्या घरी मांजरी, कुत्रे, पोपट व खारूताई आहे. पण यावेळी हत्ती होता. यापूर्वी मी कधी हत्तीसोबत वेळ व्यतित केला नव्हता. पण मी प्राणी फ्रेंडली असल्यामुळे त्याच्यासोबतही काम करणे सोप्पे झाले.

या भूमिकेच्या तयारीसाठी काय केले? माहूतचा रोल करण्यासाठी शारिरीकरित्या मला स्ट्राँग व्हायला सांगितले. कारण हत्तीसोबत राहणे सोप्पे नाही. हत्ती खूप ताकदवान असतात. त्यामुळे मी वर्कआऊट सुरू केले. हत्ती जेव्हा धावतो त्यावेळी पाठीला धक्के बसून त्रास होऊ शकतो. त्यामुळे हत्तीवर बसण्याची देखील ट्रीक असते. तर या सगळ्या गोष्टींसाठी शारिरीकरित्या मजबूत होण्यासाठी मी वर्कआऊट केले. आधी मी योगा, धावायचे व सुर्य नमस्कार वगैरे करायचे. या चित्रपटासाठी मी फिजिकली व मेंटली मेहनत घेतली. माझ्या मते या चित्रपटासाठी माझे मी सर्वस्व दिले. 

हॉलिवूडचे दिग्दर्शक चक रसेल यांच्याबद्दल काय सांगशील?मी कधी कल्पनादेखील केली नव्हती की मला हॉलिवूडच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळेल. मला निर्मात्यांनी सांगितले की चक रसेल यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे. तेव्हा मला कळले की या चित्रपटाचे दिग्दर्शक चक रसेल आहेत. हे कळल्यावर माझी बोलतीच बंद झाली होती. त्यात व्हिडिओ कॉलवर बोलायचे होते. एवढी मोठी परीक्षा यापूर्वी मी कधीच दिली नव्हती. व्हिडिओ कॉलचे बटणच प्रेस होत नव्हते. माझे हात थरथरत होते. खूप दडपण आले होते. गणपती बाप्पा म्हणत मी व्हिडिओ कॉल लावला आणि त्यांनी बोलायला सुरूवात केली. ते म्हणाले की मी ऑडिशन पाहिले. खूप छान काम केले आहेस आणि तुझ्यात मी माझ्या चित्रपटातील शंकरा पाहिली आहे. त्यानंतर मी नॉर्मल झाले. खरेच ते खूप मॅजिकल आहेत. इतका मोठा दिग्दर्शक आहे तरीदेखील ते खूप प्रेमळ आणि विनम्र आहेत. 

तुझा सहकलाकार विद्युत जामवालसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की विद्युत जामवालसोबत मुख्य भूमिकेत मला काम करण्याची संधी मिळाली. जितका तो रफटफ दिसतो तितकाच तो प्रेमळ व मनमिळाऊ आहे. त्याला लोकांना आदर कसा द्यायचा हे बरोबर माहित आहे. आपण किती स्ट्राँग आहोत, हे आपल्याला माहित नसते. पण जेव्हा मी विद्युतसोबत त्याच्या सांगण्यानुसार काम करायला सुरूवात केली. तेव्हापासून मला समजले की मी किती स्ट्राँग आहे. 

या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?खूप अप्रतिम व अविस्मरणीय असा जंगली चित्रपटाचा अनुभव होता. शूटिंगपूर्वी मी एक महिना हत्तींसोबत राहिले होते. शूटिंगच्या पहिला दिवस देखील ट्रेनिंगचाच भाग होता. फक्त कॅमेरा लावला होता. त्यावेळी पहिल्याच शॉटमध्ये मी फ्रेममध्ये मला व दीदी(हत्तीणी)ला पाहिले आणि माझे अश्रू अनावर झाले. बॉलिवूडमधील पहिल्याच चित्रपटाला मला बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे. तर मला काय पाहिजे आणखीन अशा माझ्या मनात भावना आली आणि मला रडू आले. 

'जंगली' चित्रपटानंतर बॉलिवूडमधून तुला काही ऑफर्स आल्या का? मराठीतही काम करतेस का?बॉलिवूडच्या ऑफर अद्याप आलेल्या नाहीत. सध्या जंगलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मराठीत वाचन चालू आहे. काही चांगल्या स्क्रीप्ट्स वाटल्या आहेत. पण, अद्याप शिक्कामोर्तब केले नाही.

टॅग्स :पूजा सावंतजंगलीविद्युत जामवाल